पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम मागील दोन आठवड्यांहून अधिक काळ बंद आहे. बॅरिकेडिंगची रूंदी कमी केली तरच परवानगी मिळेल, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली होती. आधी यास नकार देणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अखेर बॅरिकेंडिगची रूंदी कमी करण्यास होकार दिल्याने हे काम आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. तरीही एवढे दिवस काम बंद राहिल्याने प्रकल्पाला विलंब लागण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामासाठी कृषी महाविद्यालय चौकात बॅरिकेडिंगसाठी परवानगी मागण्यात आली होती. या महिन्यात पुण्यात जी-२० कार्यगटाच्या दोन बैठका झाल्या. याचबरोबर पालखी सोहळाही पुण्यातून पुढे गेला. यामुळे मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडिंगला परवानगी देण्यात आली नव्हती. बॅरिकेडिंग नसल्याने गणेश खिंड रस्त्यावर मेट्रोचे काम दोन आठवड्यांहून अधिक काळ बंद आहे. बॅरिकेडिंगची परवानगी वाहतूक पोलिसांकडून अद्याप मिळालेली नाही.

हेही वाचा >>> पुणे: महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीने कोयता कोठून आणला ?… पोलिसांकडून शोध सुरू

या प्रकरणी पीएमआरडीए आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बॅरिकेंडिगची रुंदी कमी करण्याची तयारी पीएमआरडीएने दर्शविली. मेट्रोच्या खांबाचे काम पूर्ण झाले आहे, तेथील बॅरिकेडिंग ११ मीटरवरून ६ ते ७ मीटरवर आणण्यात येईल, असे पीएमआरडीएने सांगितले. रस्ता जास्तीत जास्त खुला करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. यावर आठवडाभरात बॅरिकेडिंगला परवानगी देण्याची तयारी उपायुक्त मगर यांनी दर्शविली, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे: येरवडा कारागृहात पुन्हा चार मोबाइल संच सापडले

हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग २३ किलोमीटरचा आहे. याच मार्गावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअर या दरम्यान दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाची लांबी १.७ किलोमीटर असणार आहे. हा उड्डाणपूल मेट्रोच्या कामाचा भाग असणार आहे. बॅरिकेडिंगला परवानगी नसल्याने हे काम रखडले असून, काम पूर्ण होण्याचा कालावधी पुढे जाऊ शकतो, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी मेट्रोच्या कामामुळे वाढत आहे. रस्त्यावरील बॅरिकेडिंगची रुंदी कमी करण्यास मेट्रोला सांगण्यात आले होते. रुंदी कमी केली नसल्याने त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तिचा विचारही करणे गरजेचे आहे. – विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

वीर चापेकर चौक ते मोदीबाग यादरम्यान मेट्रोचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणचे बॅरिकेडिंग ११ मीटरवरून ६ ते ७ मीटर करण्यात येईल. यामुळे वाहनांसाठी जास्तीत जास्त रस्ता खुला होईल. कृषी महाविद्यालय चौकातील कामासाठी बॅरिकेडिंगला वाहतूक पोलिसांकडून आठवडाभरात परवानगी मिळेल. – आर.एल.ठाणगे, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government quarrel in the work of pune metro work stopped for 15 days pune print news stj 05 ysh