बेकायदा गुटखा विक्री, तसेच वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, लोणावळा परिसरात गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. या कारवाईत पोलिसांनी गुटखा, तसेच ट्रक, असा २५ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना लोणावळा परिसरात कुसगाव गावाजवळ कर्नाटकातील ट्रक येणार असून, ट्रकमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये पोत्यात भरून ठेवलेल्या गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी गुटखा भरलेली ३४२ पोती, तसेच ट्रक जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक मोहम्मद खलील जमाल अहमद शेख (वय ४०, रा. लालगिरी, बहामपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक), नसरुद्दीन बुऱ्हानसाब खडखडे (वय ३५, रा. खडखड गल्ली, डुबलगुडी, जि. बिदर, कर्नाटक) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – थोरातांच्या नाराजीसंदर्भात काँग्रेस नेत्यांचे मौन

हेही वाचा – Chinchwad By Election: चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी; जयंत पाटील यांची घोषणा

पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, प्रकाश वाघमारे, युवराज बनसोडे, अमोल शेंडगे आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, पुणे पोलिसांनी शहरातील गुटखा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे शहर परिसरातून २२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gutkha worth 11 lakhs seized in lonavala pune print news rbk 25 ssb