हिंदुराष्ट्र सेनेशी संबंधित असलेल्या तुषार हंबीर याच्यावर तीन ते चार जणांनी ससून रुग्णालयात घुसून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ससून रुग्णालयात घडली आहे. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

थेट ससून रुग्णालयात शिरून हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हंबीर यांच्यावर यापूर्वीही येरवडा कारागृहात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हंबीर याच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो येरवडा कारागृहात आहे. आजारी असल्यामुळे २५ ऑगस्टपासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार जण कोयते घेऊन ससून रुग्णालयात आले. त्यांनी हंबीरला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. मात्र, त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu rashtra sena tushar hambir attacked in sassoon hospital pune print news scsg