पुणे : उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्यासाठी वाहनधाकरांना दीड महिना (१५ ऑगस्ट) मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यात आत्तापर्यंत केवळ ३० टक्के वाहनधारकांनीच (२३ लाख) नोंदणी करून पाटी बसवून घेतली आहे, तर काही प्रतीक्षेत आहे. परिवहन विभागाने ही मुदतवाढ अखेरची असल्याचे स्पष्ट करून वाहनधारकांनी वेळेत पाटी बसवली नाही, तर वाहनावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वीची सुमारे दोन कोटी वाहने आहेत. या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. य़ासाठी परिवहन विभागाने तीन कंपन्यांची नियुक्ती करून विभागनिहाय पाटी लावण्यासाठी कार्यवाही सुरु केली. सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत मुदत असताना अपुरी केंद्रे, प्रशिक्षित कामगारांचा अभाव आणि इतर तांत्रिक त्रुटींचा अभाव असल्याने परिवहन विभागाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली.

मधल्या काळात वाहनधारकांनी नोंदणी सुरू केल्याने मागणी आणि पुरवठ्यामध्ये त्रुटी आढळून आल्याने वाहनधारकांचा प्रतीक्षा कालावधी वाढला. परिवहन विभागाने नंतर ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, अद्यापही सुरक्षा क्रमांक पाटी लावण्यात म्हणावी तितकी प्रगती झालेली नाही. त्यामुळे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मुदतवाढीसंदर्भात मागणी करण्यात आली. सरनाईक यांनी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचे जाहीर केल्यानंतर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढून त्याची माहिती दिली.

एचएसआरपी बसविण्यासाठी वाहनधारकांना पुढील तीन ते चार महिन्यांची वेळ आरक्षित करून देण्यात आली आहे. संबंधित तिन्ही कंपन्यांकडून पाट्यांचा पुरवठा होत नसल्याने कामात अडथळे निर्माण होत आहे. अनेक केंद्रचालकांना याचा फटका बसला असून, काहींनी केंद्रे बंद केली आहेत. तातडीने उत्पादन आणि केंद्रांची संख्या वाढवावी. – बाबा शिंदे, अध्यक्ष, माल आणि प्रवासी वाहतूक संघटना, महाराष्ट्र राज्य

राज्यात नागरिकांनी तातडीने नोंदणी करून पाटी बसवून घ्यावी. वाहनधारकांसाठी ही अखेरची मुदतवाढ आहे. मुदतीनंतर पाटी न लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. – विवेक भीमनवार, आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग