पुणे : ‘आदित्य एल१’ या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेअंतर्गत टिपलेला विदासाठा खुला करण्यात आला आहे. आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) नेतृत्त्वाखाली तयार करण्यात आलेल्या सूट (सोलर अल्ट्रावायोलेट इमेजिंग टेलिस्कोप) या सौर वेधशाळेच्या निरीक्षणांचा हा विदासाठा असून, या विदासाठ्याद्वारे सूर्याच्या संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे.

आयुकाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आदित्य एल१ ही देशाची पहिली सौर मोहीम राबवण्यात आली आहे. त्यात लॅग्रेंज पॉईंट १ या स्थित बिंदूवर सौरयान कार्यरत आहे. त्यामुळे सूर्याचा अखंडितपणे अभ्यास करता येतो.

आयुकाने तयार केलेल्या सूट या सौर वेधशाळेद्वारे सूर्याच्या २०० ते ४०० नॅनोमीटर या तरंगलांबीमध्ये अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांचे निरीक्षण करण्यात येते. या उपकरणाद्वारे सूर्याच्या प्रकाशमंडळ (फोटोस्फिअर) आणि वर्णमंडळ (क्रोमोस्फिअर) यांच्या पूर्ण प्रतिमा टिपल्या जातात. या प्रतिमा आणि विदाचा विद्युत चुंबकीयता, सौरलाटा, स्फोटांसह अन्य घडामोडींचा पृथ्वीवरील अवकाशीय, हवामानसंबंधित परिणामांचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे.

सूट या सौर वेधशाळेने टिपलेल्या विदासाठ्यात प्रतिमांसह अन्य तांत्रिक माहितीचा समावेश आहे. जून २०२४ पर्यंत केलेल्या पडताळणीनंतर पूर्णपणे प्रक्रिया केेलेला विदासाठा खुला करण्यात आला आहे. हा विदासाठ्याचा वैज्ञानिक संशोधनासाठी वापर करता येणार आहे. सूटच्या चमूने पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आदित्य सायन्स सपोर्ट सेल’च्या सहकार्याने देशभरातील विविध संस्थांमध्ये ही निरीक्षणे समजून घेण्यात आणि त्यांचे विश्लेषण करण्यात मदत करण्यासाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

१ जून २०२४ पासूनचा विदासाठा ‘इस्रो सायन्स डेटा अर्काइव्ह’ (https://pradan.issdc.gov.in/al1/) या संकेतस्थळाद्वारे खुला करण्यात आला आहे. आता हा विदासाठा खुला करण्यात आल्याने देशातील विद्यार्थी, शास्त्रज्ञांसह आंतरराष्ट्रीय संशोधन समुहांना या स्रोताचा संशोधनासाठी वापर करता येणार आहे. सूट दुर्बिणीचा विदा सूर्याच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातून सूर्याच्या संशोधनाला महत्त्वपूर्ण दिशा मिळणार आहे.