पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पिंपरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरून काम (वर्क फ्रॉम होम) देण्याच्या आमिषाने दोघांची ३१ लाखांची फसवणूक झाली आहे.

पिंपरीतील एका कंपनीमध्ये घरी काम देण्याचे आमिष दाखवून अनामत स्वरूपात तब्बल २२ लाखांहून अधिक रक्कम घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एका ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीच्या टेलिग्रॉम ॲपवर संदेश पाठवून एका कंपनीमध्ये घरी काम देण्याचे आमिष दाखवले. तिने फिर्यादीकडून अनामतच्या स्वरूपात एकूण २२ लाख ६४ हजार ५६८ रुपये घेतले. मात्र, काम आणि अनामत स्वरूपात घेतलेली रक्कमही परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

भोसरीत वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक

घरी काम देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची नऊ लाख ६ हजार २४१ रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३ मे २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत मोशी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी एका ४८ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्राम आयडी धारकाने फिर्यादींना ग्रुपमध्ये ॲड केले. त्यानंतर त्यांचे अकाऊंट तयार करून रेटिंगच्या ॲडचे टास्क करायला लावले. या कामावर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण नऊ लाख ६ हजार २४१ रुपये भरण्यास लावून त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

मोबाईल हॅक करून बँक खात्यातून नऊ लाखांची ऑनलाइन चोरी

एका व्यावसायिकाचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी नऊ लाख ३४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून घेतले. ही घटना मोशी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. याप्रकरणी एका ४१ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मोबाईल हॅक करून त्यांच्या एका बँक खात्यावरून ५० हजार रुपये आणि दुसऱ्या बँक खात्यावरून आठ लाख ८४ हजार रुपये असे एकूण नऊ लाख ३४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने इतर बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेऊन त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

सॉफ्टवेअर चोरी करून कर्मचाऱ्यांनी स्थापन केली स्वतःची कंपनी

एका कंपनीत सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे सॉफ्टवेअर चोरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नवीन कंपनी स्थापन केली. ही घटना दापोडी येथे घडली. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या संचालकांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम करत असताना कंपनीने दिलेली लॅपटॉपमधील हार्ड डिस्क काढून घेतली. त्यामधील डायनो जीयुआय आणि सीसीआरटी या सॉफ्टवेअरची चोरी केली. स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्यांनी खोटी माहिती खरी भासवून फसवणूक केली. कंपनीचे आर्थिक नुकसान केले. फिर्यादीच्या मालकीच्या कंपनीचा लोगो वापरून कॉन्ट्रॅक्ट्स मिळवले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.