पिंपरी- चिंचवड: ११ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. ही घटना ऐन दसरा, विजयादशमीच्या दिवशी घडली आहे. अमेय फडतरे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय फडतरे हा अकरा वर्षीय मुलगा लिफ्ट सोबत खेळत होता. जिन्याने वर जाऊन लिफ्टने खाली यायचा. हे असंच काही मिनिट सुरू होत. याचा शेवट असा होईल असं कुणालाही वाटलं नाही. लिफ्टच्या दरवाजाच्या मधल्या जागेत अडकून अमेय गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात अडकलेल्या अमेयला अग्निशमनच्या जवानांनी तात्काळ येऊन काढलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, अमेयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. दिघी पोलीस याबाबत तपास करत आहेत.
“पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपला मुलगा कुठं आहे? कसा खेळत आहे, हे पाहायला हवे. लहान मुलांनी मोठी माणसे असल्याशिवाय लिफ्टमध्ये जाऊ नये.” – बापू बांगर, पोलीस उपायुक्त