पुणे : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फैजान इक्बाल तासीलदार (वय २४, रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणराज सुनील ठाकर (रा. सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ, बिबवेवाडी) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात बुधवारी मध्यरात्री २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. लाकडी दांडके आणि कोयत्याने वाहनांच्या काचा फोडल्याने या परिसरात घबराट पसरली. याप्रकरणी पोलिसांनी अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे, गणराज सुनील ठाकर यांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपींनी बुधवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्या वेळी तासीलदार मोटारीत झोपला होता. मोटारीच्या काचेवर कोयता आपटल्याने काच फुटली. काच फुटल्याचा आवाज झाल्याने तासीलदारने मोटारीचा दरवजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी ठाकर आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ करुन डोक्यावर कोयत्याने वार केला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाकर याच्यासह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत.

तीन दिवसांपूर्वी बिबवेवाडीत पूर्ववैमनस्यातून सराईत पवन सुभाष गवळी (वय २८, रा. ओटा परिसर, इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. माधव वाघाटे खून प्रकरणात बदला घेण्यासाठी जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या गवळीवर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी मध्यरात्री सराइतांनी दहशत माजवून बिबवेवाडीत ७० वाहनांची तोडफोड केल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.

उपनगरात दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. येरवडा, वारजे, पर्वती भागात तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. उपनगरातील वाढती गुन्हेगारी, तसेच वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. वाहन तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहरात तोडफोडीचे प्रकार सुरू आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune another case registered against bibwewadi vehicle vandalizer for koyta attack pune print news rbk 25 css