पुणे : ‘असुरी शक्तीविरुद्ध लढण्यासाठी केवळ शक्तीची आवश्यकता नाही, तर सत्तेची आवश्यकता आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे आयोजित ‘सखी गीत रामायण आणि राम सीता स्वयंवर’ या कार्यक्रमाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर आणि हेमंत रासने, ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डाॅ. मिहिर कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस म्हणाले, ‘जीवनमूल्य कसे असले पाहिजे, हे प्रभू श्रीराम यांनी शिकविले. आपण त्यांना ईश्वर मानतो. ईश्वरीय शक्तीने ते रावणाला पराभूत करू शकले असते. त्या काळात रावणाची असुरी शक्ती ही विश्वातील सर्वांत मोठी शक्ती मानली जात होती. मात्र, प्रभू श्रीराम यांनी ईश्वरीय शक्तीचा वापर न करता, समाजातील सामान्यातील सामान्य लोक, नर-वानर, पशू-पक्षी यांना एकत्रित करून त्यांंच्यातील पौरूष जागृत केले आणि त्या माध्यमातून रावणाला पराभूत केले.’

‘असुरी शक्ती कितीही मोठी असली, तरीही सज्जनशक्ती एकत्रित येऊन सत्तेच्या बाजूने उभी राहिल्यास सामान्य लोकही असामान्य काम करतात. असुरी शक्तीच्या विरुद्ध लढण्यासाठी केवळ शक्तीची आवश्यकता नाही, तर सत्तेची आवश्यकता असल्याचा संदेश प्रभू श्रीराम यांनी सामान्यातील सामान्य माणसाला दिला आहे. या जीवनमूल्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचे भान आपल्याला राहावे,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी सात दशकांपूर्वी रचलेले ‘गीतरामायण’ अजरामर झाले. गीतरामायणामुळे ‘गदिमांं’ना आधुनिक वाल्मीकीची उपमा मिळाली. आजही गीतरामायण ऐकत असताना त्या वेळचे प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. यामध्ये जीवनातील सर्व प्रकारचे रस आणि संवेदना अनुभवायला मिळतात. आनंद, दु:ख, हास्य, अश्रू आणि भावना यातून अनुभवता येते,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune cm devendra fadnavis said power is important to fight evils pune print news css