पुणे : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव किंवा भंगारात काढण्याच्या प्रक्रियेला होणारा विलंब हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) अडचणीचा ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘एसटी’च्या वेगवेगळ्या स्थानकांच्या आवारात ‘आरटीओ’ने जप्त केलेली २९३ खासगी वाहने अनेक महिन्यांपासून धूळखात पडून असल्याने महामंडळाच्या बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

स्वारगेट स्थानकाच्या परिसरातील बसमध्ये तरुणीवर अतिप्रसंगाची घटना घडल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या आवारातील खासगी वाहने तातडीने लिलावात किंवा भंगारात काढण्याचा आदेश दिला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही एसटी स्थानकांच्या आवारातील जुन्या वाहनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, लिलाव किंवा भंगारात काढण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने संबंधित वाहने अद्याप स्थानकांच्या आवारात धूळखात आहेत.

स्थानकात खासगी वाहने कशी?

मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी आणि मालवाहतूक, अपघात किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. जप्त केलेली ही वाहने जागा उपलब्ध नसल्याने एसटी स्थानकांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधित वाहनमालकांना परिवहन विभागाकडून नोटीस बजावून दंड भरल्यानंतर पुन्हा दिली जातात. न्यायालयात खटला सुरू असेपर्यंत ही वाहने या ठिकाणी ठेवण्यात येतात. अशा वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

वाहनमालकांची टाळाटाळ

जप्त वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असते. त्यांवर दंडही आकारण्यात आलेला असतो. अनेक वाहने जुनी असतात. त्यामुळे वाहनमालक वाहन ताब्यात घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले.

बारामती स्थानकात सर्वाधिक वाहने

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारामती बस स्थानकात सर्वाधिक १०७ जुनी खासगी वाहने आहेत. त्या खालोखाल सासवड स्थानकात ३८, दापोडी विभागीय कार्यशाळा आणि इंदापूर स्थानकात प्रत्येकी ३०, दौंड स्थानकात २६, राजगुरूनगर १९, शिरूर १७ आणि अन्य स्थानकांत २९३ वाहने आहेत. यामध्ये प्रवासी खासगी बस, ट्रक, मालमोटार यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जप्त केलेली वाहने रस्त्यावर उभी करण्याऐवजी जागेअभावी नजीकच्या एसटी स्थानकाच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. कायदेशीर प्रक्रियेमुळे विलंब होत आहे. वाहनांच्या चालक-मालकांना दंड भरून वाहन घेऊन जाण्याबाबत नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. संबंधितांनी मुदतीत दंड न भरल्यास वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. – स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</strong>