पुणे : बैलगाडा शर्यतीचा बैल खरेदीतील व्यवहारातून तरुणाच्या डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बारामती परिसरात घडला. याप्रकरणी सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या मुलांसह तिघांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गाैरव शहाजी काकडे, गाैतम शहाजी काकडे (दाेघे रा. निंबुत, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यासह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात रणजीत निंबाळकर (रा.तावडी, ता.फलटण, जि. सातारा) जखमी झाले. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत अंकिता रणजित निंबाळकर (वय २३) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत निंबाळकर यांनी आराेपी गाैतम काकडे याला ‘सुंदर’ नावाचा बैल विक्री केला हाेता. या व्यवहाराचे ३७ लाख रुपये झाले हाेते. त्यापैकी पाच लाख विसार म्हणून दिले हाेते. उर्वरित रक्कम नेण्यासाठी आरोपी काकडे यांनी निंबाळकर यांना निंबुत येथील घरी बाेलवले. त्यानुसार गुरुवारी (२७ जून) रात्री रणजीत निंबाळकर कुटुंबीयांसोबत काकडे यांच्या घरी गेले होते.

हेही वाचा : पुणे पोर्श अपघात प्रकरण: देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितल्या पोलिसांच्या ‘या’ चुका; म्हणाले, “पहिली चूक म्हणजे…”

तुम्ही संतोष तोडकरला ‘मी पैसे दिले नाहीत’, असे का सांगितले, अशी विचारणा आरोपी गौतमने रणजीत यांच्याकडे केली. ’ तुम्ही असे बाेलायला नकाे हाेते. मी तुम्हाला सकाळी पैसे देताे. तुम्ही आता मुद्रांकावर (स्टॅम्प पेपरवर) स्वाक्षरी करा’, असे गौतमने त्यांना सांगितले. ‘तुम्ही माझे राहिलेले पैसे द्या. मी लगेच स्वाक्षरी करताे आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल, तर तुमचे पाच लाख रुपये मी तुम्हाला परत देताे, माझा बैल मला परत द्या’, असे रणजीत यांनी आरोपीला सांगितले.

हेही वाचा : डॉ. बाबा आढाव यांचा राज्य सरकारला इशारा : म्हणाले, “माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, नाहीतर…”

त्यानंतर निंबाळकर मोटारीकडे निघाले होते. ‘तू बैल कसा घेऊन जाताे तेच मी बघताे’, असे म्हणून गौतमने त्याचा भाऊ गाैरव आणि साथीदारांना बाेलवून घेतले. ‘हयाला मारा, लय बाेलताेय हा’ असे गौतमने साथीदारांना सांगितले. आरोपी गौरवने रणजीत यांच्यावर काठी उगारून शिवीगाळ केली. त्यावेळी वैभव कदमने मध्यस्थी केली. ‘आता वाद घालू नका, उद्या व्यवहारावर चर्चा करू’, असे वैभवने आरोपींना सांगितले. त्यावेळी ‘तू बैल कसा नेतो ते बघतो, तुला जिंवत ठेवणार नाही,’अशी धमकी देऊन गौरवने त्याच्याकडील पिस्तुलातून रणजीत यांच्या डोक्यात गाेळी झाडली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रणजीत यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune firing while purchasing bullock for bailgada sharyat case registered on shahaji kakde s son pune print news rbk 25 css