पुणे : भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या टोळक्याला विचारणा केल्याने लष्करी जवानाशी अरेरावी करून धक्काबुक्की करण्याची घटना येरवडा भागात घडली. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांशी अरेरावी करून त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तरुणीसह पाच जणांना अटक केली.

या प्रकरणी ज्ञानेश्वर सुंदर नटकले (वय २६), राहुल संजय साळवे (वय २३), रोहित अशोक डोंगरे (वय २७, रा. भीमनगर, विश्रांतवाडी), हर्षल भोसले (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्यासह एका तरुणीला अटक करण्यात आली. याबाबत एका लष्करी जवानाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी जवान आणि सहकारी दुचाकीवरून शनिवारी (३० ऑगस्ट) पहाटे तीनच्या सुमारास येरवडा भागातून निघाले होते. त्या वेळी वेगवेगळ्या दुचाकीवरून भरधाव वेगात नटकले, साळवे, डोंगरे, भोसले निघाले होते. तक्रारदार लष्करी जवानाने त्यांना दुचाकी भरधाव वेगात चालवू नका, असे सांगितले. या कारणावरून आरोपींनी लष्करी जवानाशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. जवान आणि सहकाऱ्याला अडवून त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी, मोबाइल संच हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. लष्करी जवानाला जिवे मारण्याची धमकी दिली.

येरवड्यातील जेल रोड पोलीस चौकीपासून काही अंतरावर हा प्रकार सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचारी तेथे गेले. त्यांनी टोळक्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत.