पुणे : प्रसिद्ध कवी-गज़लकार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर (वय ६९) यांचे बुधवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेले करंदीकर गेल्या आठ दिवसांपासून आजारी होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्रीनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. करंदीकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिफेन्स अकौंट्समध्ये नोकरी करतानाच करंदीकर यांनी साहित्याचा छंद जोपासला. गज़ल या काव्यप्रकाराचे तंत्र आत्मसात करण्यासाठी त्यांनी गज़लसम्राट सुरेश भट यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांचे ‘धुनी गझलांची’ आणि ‘कविकुल’ हे गज़लसंग्रह प्रकाशित झाले असून, ‘गज़लगंगा’ हा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तसेच, श्री क्षेत्र तिरुपती माहात्म्यावर आधारित ‘अभिनव श्रीव्यंकटेश माहात्म्य’ (२०१६), ‘संगीत श्रीनिवास-पद्मावती विवाह नाट्य’– पाच अंकी’ संगीत नाटक ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

हेही वाचा : पुण्यातून देवेंद्र फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार : आमदार रविंद्र धंगेकर

‘तीक्ष्ण तीरासारखा घुसलास तू ! शूर योद्ध्यासारखा लढलास तू ! घे सलामी आमुची गज़लेतुनी गज़लसम्राटा, अमर झालास तू !’ अशा गज़लमधून दीपक करंदीकर यांनी सुरेश भट यांचे समर्पक वर्णन केले आहे. ‘पेल्यांवरील प्याले प्यालो तुझ्यामुळे मी, गर्दीत माणसांच्या आलो तुझ्यामुळे मी’ या त्यांची गज़लवरील काव्यपंक्तीने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. ‘अक्षरधुनी, अक्षयधुनी’ हा गज़लवरील रंगमंचीय कार्यक्रम ते सादर करत असत. काव्यशिल्प पुरस्कार, संगत-संगत प्रतिष्ठानचा भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट गज़लकार पुरस्काराने ते सन्मानित झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune poet deepak karandikar passes away pune print news vvk 10 css