पुणे : आदिशक्तीची पूजा बांधणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारी (२२ सप्टेंबर) सुरुवात होत असून ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली असून फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने मंदिरे सजली आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी मंदिरे सजली असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेत मंदिर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. या उत्सव काळात पूजा, अभिषेक, भजन, श्रीसुक्त पठण, देवीचा जागर आणि गोंधळ अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, कन्यापूजन, सामाजिक संस्थांमध्ये भोंडला असे कार्यक्रम होणार आहेत.

पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये सोमवारी पहाटे साडेपाच वाजता रोहित बेंद्रे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तत्पूर्वी देवीला अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत खुले राहणार आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात विशेष सजावट करण्यात येणार असून, दररोज देवी विविध रूपांमध्ये आणि विविध वाहनांवर आरूढ असेल.

काळ्या पाषाणामध्ये साकारलेली सुबक मूर्ती असलेल्या बुधवार पेठ येथील श्री काळी जोगेश्वरी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज सकाळी षोडशोपचार पूजा, सप्तशती पाठ, श्रीसुक्त पठण, जोगवा, नवचंडी होम, असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. देवी दररोज वेगवेगळ्या वाहनावर आरूढ होणार आहे. सकाळी नऊ आणि रात्री आठ वाजता आरती होणार आहे.

शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिरात विधीवत पद्धतीने घटस्थापना आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा होणार आहे. भवानी पेठेतील श्री भवानी देवी मंदिरात सकाळी सहा वाजता महारुद्राभिषेक आणि महापूजा होणार आहे. त्यानंतर तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार असून सकाळी अकरा वाजता घटस्थापना होणार आहे. उत्सवकाळात दररोज ललिता सहस्रनाम पठण, श्रीसुक्त पठण होणार असून, दिवसभर विविध भजनी मंडळे भजनसेवा रुजू करतील.

सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात सोमवारी गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता घटस्थापना होणार आहे. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे झाल्याचे औचित्य साधून पहिल्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री साडेआठ वाजता राधिका आपटे यांचे दशावतार सादरीकरण होईल. त्यापूर्वी मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उदघाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता होईल.

सेनापती बापट रस्त्यावरील श्री देवी चतु:शृंगी मंदिरात पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होणार असून, मंदिराच्या आवारात दर वर्षीप्रमाणे जत्राही भरणार आहे. मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना होणार आहे. देवीला मंगलस्नान, सुक्ताभिषेक, रुद्राभिषेक करून देवीची सालंकृत षोडषोपचार महापूजा करून देवीला महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहे. मंदिरात दररोज भजन, कीर्तन, प्रवचनासह श्रीसुक्त, ललितासहस्रनाम, महिषासूरमर्दिनी स्तोत्र पठण होणार आहे. सातारा रस्त्यावरील पद्मावती देवी, तळजाई माता देवस्थान, कर्वेनगर येथील वनदेवी अशा विविध मंदिरांमध्ये देवीचा जागर होणार आहे.