पुणे : शहरात डासांपासून पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे दररोज सरासरी ३८ रुग्ण आढळले असून, एकूण १ हजार १५० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर चिकुनगुन्याचे ऑगस्टमध्ये ५२ रुग्ण आढळले आहे. एकाच वेळी डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्ययंत्रणांची चिंता वाढली आहे. यामुळे डास प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
शहरात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे एकूण १ हजार १५० संशयित रुग्ण आढळले असून, डेंग्यूचे निदान झालेले ८२ रुग्ण आहेत. शहरात डेंग्यूचे या वर्षात फेब्रुवारीमध्ये ५, मार्च ३, एप्रिल २ आणि जुलैमध्ये ३४ रुग्णांचे निदान झाले. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. याचबरोबर जुलैमध्ये ६३६ संशयित रुग्ण आढळले होते, तर ऑगस्टमध्ये १ हजार १५० संशयित रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूची लक्षणे ही इतर विषाणुजन्य तापाच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे ही लक्षणे दिसून येतात. त्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात.
आणखी वाचा-पिंपरी पोलिसांनी तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे केली जप्त; तडीपार गुंड जेरबंद
चिकुनगुन्याचा संसर्गही वाढू लागला असून, या महिन्यात एकूण ५२ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या जूनमध्ये १ आणि जुलैमध्ये २४ होती. गेल्या महिन्यात चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या आजाराची लक्षणे साधारणतः दूषित डास चावल्यावर ३ ते ७ दिवसांनंतर दिसून येतात. या आजाराचा अधिशयन काळ ४ ते ७ दिवस आहे. या आजारात ताप, हुडहुडी भरणे, डोके दुखणे, मळमळ होणे, ओकारी होणे, तीव्र सांधेदुखी, अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसून येतात. या आजारात कंबरेतून वाकलेला रुग्ण हे नेहमी आढळणारे लक्षण आहे. चिकुनगुन्या आजारातून बरे होताना पुष्कळदा नेहमी व सतत राहणारी सांधेदुखी आढळून येते.
चिकुनगुन्या आजारावर विशिष्ट औषधोपचार उपलब्ध नाही. या आजारात रुग्णाच्या लक्षणांनुसार उपचार करावे लागतात. वेदनाशामक औषध घेतल्यास, तसेच भरपूर आराम केल्यास रुग्णाला फायद्याचे ठरते. आजारी व्यक्तीला डास चावू नये, याकरिता काळजी घ्यावी. जेणेकरून इतर व्यक्तींमध्ये आजाराचा प्रसार होणार नाही. -डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
आणखी वाचा-मोठ्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकांची?
डासोत्पत्ती रोखण्यासाठी काय कराल…
- घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करा.
- पाणी साठविण्याची सर्व भांडी योग्य पद्धतीने झाकून ठेवा.
- घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा.
- निरुपयोगी व टाकाऊ वस्तू घराच्या छतावर आणि परिसरात ठेवू नका.
- शक्यतो पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत.
शहरातील ऑगस्टमधील रुग्णसंख्या
- डेंग्यूचे संशयित रुग्ण – ११५०
- डेंग्यूचे निदान झालेले रुग्ण – ८२
- चिकुनगुन्याचे रुग्ण – ५२
© The Indian Express (P) Ltd