पुणे : हजारो पणत्यांच्या प्रकाशात शनिवारी पहाटे पर्वती उजळून निघाली. पर्वती परिसरात दररोज फिरायला येणाऱ्या व्यायाम प्रेमी पुणेकरांकडून शनिवारी पर्वती दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर असंख्य पुणेकर नागरीक पर्वतीवरील दीपोत्सवात सहभागी झाले होते. असंख्य दिव्यांनी पर्वती अक्षरशः उजळून निघाली. यावर्षी दीपोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
पहाटेच्या चार वाजता ब्राह्म मुहूर्तपासून युवक-युवती, महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून पर्वतीवर आवर्जून उपस्थित होते. पहाटेच्या शीतल वातावरणात पर्वतीवर मंगलमय वातावरणात असंख्य पणत्या लावण्यात येत होत्या. दीपोत्सव पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत साजरा करण्यात आला. भरजरी वस्त्र नेसलेल्या महिला आणि पारंपरिक वेशभूषेतील पुरुष तसेच लहान मुले देखील पर्वतीवरील दीपोत्सवात एक एक पणती लावत होते. यावेळी असंख्य नागरिकांनी मोबाईलमध्ये एकमेकांच्या छबी टिपल्या. ‘जय श्रीराम’ जयघोषही करण्यात आला. श्रीरामाची सामूहिक आरती करण्यात आली.
पर्वतीवरील मुख्य देवदेवेश्वर मंदिर, श्री कार्तिक स्वामी मंदिर, श्री विष्णू मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पेशवेकालीन संग्रहालय परिसर, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे चीर विश्रांतीस्थळ आणि पुतळा तसंच श्रीमंत बाजीराव पेशवे पुतळा परिसर आणि पर्वतीच्या एकेक पायरीवर एकेक पणती लावून संपूर्ण पर्वतीवर प्रकाशोत्सव साजरा करण्यात आला.
यावर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यामध्ये पर्वती दीपोत्सव समूहाबरोबरच पर्वती ग्रुप, चाची ग्रुप, माऊली ग्रुप, तळजाई ग्रुप यांनी पुढाकार घेतलेला असून काका पवार तालीम आंतरराष्ट्रीय संकुल जांभूळवाडी, गोकुळ वस्ताद तालीम हरिश्चंद्र बिराजदार, शिवराम दादा तालीम गणेश पेठ, सह्याद्री संकुल वारजे, मामासाहेब मोहोळ संकुल, कात्रज यांचे विशेष सहकार्य लाभले होते.
पर्वती मंदिराच्या सर्व परिसरामध्ये तसेच पायऱ्यांवर सर्वत्र हजारो पणत्या लावण्यात आल्या. महत्त्वाच्या ठिकाणी रांगोळ्याही काढण्यात आल्या. पर्वतीला फिरायला व व्यायामासाठी येणाऱ्या हजारो पुणेकरांचे या दीपोत्सवाला मोलाचे सहकार्य लाभले.