पुणे : सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चाेरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी पकडले.पोलिसांनी चोरट्यांकडून पाच दुचाकी आणि एक रिक्षा जप्त केली. सोपान रमेश तोंडे (वय २७, रा. मुळशी, जि. पुणे), आकाश सुनील नाकाडे (वय २९, सध्या रा. नाईक आळी, धायरी, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तोंडे आणि नाकाडे सराइत चोरटे आहेत. सिंहगड रस्ता परिसरातून त्यांनी दुचारी चोरली होती. आरोपी तोंडे आणि नाकाडे बाह्यवळण मार्गवरील नवले पूल परिसरातून वडगावकडे निघाले होते. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, सागर शेंडगे यांना याबाबतची माहिती मिळाली. नवले पूल परिसरात सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची चैाकशी करण्यात आली. चौकशी त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. तपासात दोघांनी पाच दुचाकी, लॅपटाॅप,कॅमेरा चोरीची कबुली दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तोंडे, नाकाडे यांच्याकडून पाच दुचाकी, लॅपटाॅप, कॅमेरा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, अण्णा केकाण, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास बांदल, अमोल पाटील यांनी ही कारवाई केली.

अल्पवयीनांकडून दोन दुचाकी जप्त

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीनांना भारती विद्यापीठ पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. भारती विद्यापीठ परिसरात तपास पथकातील पोलीस कर्मचारी मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी गस्त घालत होते. त्या वेळी अल्पवयीन मुले दुचाकीवरुन निघाली होती. दोघांनी दुचाकी चोरल्याची माहिती त्यांना मिळाली. सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. दोघांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि पथकाने ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune two wheeler thieves arrested at sinhgad road area five two wheelers laptop seized pune print news rbk 25 css