पुणे : पीएमपी बसच्या धडकेत प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली स्थानकात घडली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. विजया दिलीप चव्हाण (वय ४६, रा. उंद्रे वस्ती, थेऊर रस्ता, केसनंद) असे जखमी झालेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे. याबाबत चव्हाण यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण शनिवारी (१२ जुलै) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोली स्थानकात थांबल्या होत्या. त्या वेळी पीएमपी चालकाने अचानक बस वेगाने पाठीमागे नेली. अपघातात चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या खांद्याचे हाड, तसेच बरगडी फ्रॅक्चर झाली. उपचारानंतर चव्हाण यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पीएमपी चालकाने अचानक बस पाठीमागे घेतली. चालकाच्या चुकीमुळे दुखापत झाल्याची फिर्या द चव्हाण यांनी दिली. त्यानंतर पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार घुले तपास करत आहेत. यापूर्वी पीएमपी बसचालकांच्या चुकीमुळे गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत.

शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून, गेल्या वर्षी शहरात ३३४ प्राणांतिक अपघात (फेटल ॲक्सिडेंट) होऊन ३४५ जणांचा मृत्यू, तर यंदा जून महिनाअखेरीपर्यंत १४० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अपघातास जबाबदार ठरलेल्या अवजड वाहनांचा परवाना रद्द केला जाणार आहे. तसेच, अपघातास कारणीभूत ठरलेल्या गेल्या पाच वर्षांतील अवजड वाहनांची माहिती संकलित करून ती वाहने जप्त करण्यात येणार आहेत, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच दिला.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (११ जुलै) घडली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजी आनंदराव सरडे (वय ५८, रा. सरडे वस्ती, पेरणे गाव, नगर रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सरडे हे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाले होते. लोणीकंद परिसरात जगताप डेअरीसमोर भरधाव मोटारीने दुचाकीस्वार सरडे यांना धडक दिली. अपघातात सरडे गंभीर जखमी झाले, तसेच दुचाकीचे नुकसान झाले. सहायक पोलीस निरीक्षक घाेरपडे तपास करत आहेत.