पुणे : महापालिकेच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकात उड्डाणपूल, सार्वजनिक-खासगी भागिदारीतून (पीपीपी) रस्ते उभारणीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल उभारणे, शहरातील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी २३ कोटी रुपये, सांगवी-बोपोडीला जोडणाऱ्या पुलाच्या उभारणीसाठी १५ कोटी, तर सनसिटी-कर्वेनगर यांना जोडणाऱ्या पुलासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्रांतवाडी येथे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग योजनेंतर्गत संयुक्तपणे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. साधू वासवानी पूल (कोरेगाव पार्क) ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे. एनडीए (चांदणी) चौक परिसरातील रस्त्यांच्या एकात्मिक विकासासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील दहा वर्षांपेक्षा जास्त अशा ४० जुन्या पुलांचे स्थापत्य विषयक लेखापरीक्षण करून दुरुस्तीच्या कामासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सांगवी-बोपोडी मुळा नदीवरील नवीन पुलासाठी १५ कोटी रुपये, तर सनसिटी, सिंहगड रस्ता ते कर्वेनगर नदीवरील पुलासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा – मुद्रांक शुल्क अधिभाराचे पुणे महापालिकेला १०५ कोटी, पिंपरी-चिंचवडला ३२ कोटींचा निधी

दरम्यान, पथ विभागासाठी ९९२.७१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरात दहा किलोमीटर लांबीची सायकल मार्गिका प्रस्तावित आहे. लक्ष्मी, लोकमान्य टिळक, शिवाजी, केळकर, बाजीराव रस्ता अशा मध्यवर्ती भागातील ५० वर्षे जुन्या जलवाहिन्यांच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आले असून या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. जंगली महाराज, नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यांप्रमाणे बिबवेवाडी रस्ता, भाऊ पाटील, बावधन रस्ता, नगर आणि सोलापूर हे रस्ते या संकल्पनेवर विकसित करण्यात येणार आहेत. महंमदवाडी ते हडपसरदरम्यान नवीन वाहतूक व्यवस्था होणार आहे.

हेही वाचा – पुणे : छतावर लटकणाऱ्या वीजवाहिनीच्या धक्क्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू; बोपोडीतील घटना, घरमालकाविरुद्ध गुन्हा

ई-दुचाकींसाठी चार्जिंग सुविधा

शहरात ५०० ठिकाणी रस्त्यांलगत ई-दुचाकींसाठी चार्जिंगची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच ई-दुचाकी भाड्याने उपलब्ध करून देण्यासाठी चार्जिंग स्थानक बांधण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the budget of pune mnc priority is given to construction of flyovers and roads on ppp pune print news psg 17 ssb