पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतही प्रवेशासाठीच्या पात्रता गुणांचा (कटऑफ) टक्का चढाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. नामांकित महाविद्यालयात कलाशाखेसाठी ३०० ते ४६२, वाणिज्य शाखेसाठी ३३३ ते ४६७, विज्ञान शाखेसाठी ४२० ते ४७० गुण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत एकूण २० हजार ६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, ८ हजार १०९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या फेरीत ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यातील २३ हजार ३५१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झाले होते. पहिली फेरीच्या प्रवेशाची मुदत संपल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष दुसऱ्या फेरीकडे लागले होते. त्यानुसार नियमित दुसऱ्या फेरीची यादी जाहीर करण्यात आली. या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

हेही वाचा – रेल्वे ‘मालामाल’! फुकट्या प्रवाशांमुळे ९४ कोटींचे उत्पन्न

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी खुल्या गटाचे पात्रता गुणांचा टक्का दुसऱ्या फेरीतही चढाच राहिला आहे. पहिल्या फेरीत कला शाखेसाठी २८९ ते ४६८, वाणिज्य शाखेसाठी ३७३ ते ४६६, विज्ञान शाखेसाठी ४२४ ते ४७३ पात्रता गुण आवश्यक होते. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीची तुलना करता कला शाखा आणि विज्ञान शाखेच्या गुणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. सिम्बायोसिस महाविद्यालयात कला शाखेसाठी ४६२ गुण, वाणिज्य शाखेसाठी ४५० गुण, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कला शाखेसाठी ३०० गुण, तर विज्ञान शाखेसाठी ४६२ गुण, फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेसाठी ४५६ गुण आणि विज्ञान शाखेसाठी ४७० गुण आवश्यक आहेत. बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ४६७ गुण, शिवाजीनगरच्या मॉडर्न महाविद्यालयात कला शाखेसाठी ३०३ गुण, वाणिज्य शाखेसाठी ४०३, विज्ञान शाखेसाठी ४३४ गुण, डॉ. शामराव कलमाडी हायस्कूलमध्ये कला शाखेसाठी ४४७, वाणिज्य शाखेसाठी ४३५, विज्ञान शाखेसाठी ४५६ गुण आवश्यक आहेत. तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कला शाखेसाठी ३६५, वाणिज्य शाखेसाठी ४३९, विज्ञान शाखेसाठी ४४८ गुण, हडपसरच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ३७० गुण, विज्ञान शाखेसाठी ४२० गुण, नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयात ३३३ गुण आवश्यक असल्याचे दिसून येते.

हेही वाचा – प्राध्यापक भरतीसाठी थेट UGCचा हस्तक्षेप; तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

शाखानिहाय प्रवेश मिळालेले विद्यार्थी

कला – २ हजार ४६
वाणिज्य ७ हजार ७६६
विज्ञान – १० हजार ३१३
व्यवसाय अभ्यासक्रम – ४८२

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत पात्रता गुणांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. मनासारखे महाविद्यालय मिळण्यासाठी विद्यार्थी थांबून राहात असल्याने पात्रता गुणांवर परिणाम झाल्याचे दिसत नाही. – राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the second round of 11th admission the percentage of qualifying marks increased pune print news ccp14 ssb