पुणे : मोटारचालकांना धमकावून त्यांना लुटण्यात आल्याची घटना औंध आणि बोपाेडी परिसरात घडली. येरवडा परिसरात एका पादचारी तरुणाच्या हातातील मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली.
मोटारीचा धक्का लागल्याची बतावणी करुन चोरट्यांनी एका मोटारचालकाकडील ६० हजारांचा मोबाइल संच हिसकवून नेल्याची घटना ओैंधमधील स्पायसर काॅलेज रस्त्यावर १७ जून रोजी घडली. याबाबत एका तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मोटारचालक तरुण स्पायसर काॅलेज रस्त्याने १७ जून रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी मोटार अडविली. मोटारीचा धक्का लागल्याची बतावणी करुन रस्त्यात वाद घालण्यास सुरुवात केली. मोटारचालकाला धक्काबुक्की करुन चोरट्यांनी त्याच्याकडील ६० हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
पादचारी तरुणाच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना येरवडा भागात सोमवारी (२३ जून) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. याबाबत एका तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा लातूरचा आहे. तो कामानिमित्त पुण्यात आला आहे. सोमवारी रात्री तो पत्नीबरोबर मोबाइलवर बोलत होता. येरवडा कारागृह परिसरातील काॅमर झोन रस्त्याने तो निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला.
शस्त्राच्या धाकाने मोटारचालकाची लूट
शस्त्राच्या धाकाने मोटारचालकाला लुटल्याची घटना बोपोडी मेट्रो स्थानक परिसरात घडली. याबाबत एका तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादर तरुण चिंचवड परिसरात राहायला आहे. तो मंगळवारी (२४ जून) दुपारी साडेबाराच्या सुमारास मोटारीतून निघाला होता. बोपोडी मेट्रो स्थानकाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोटार अडविली. दुचाकीाला हुल का दिली ? अशी विचारणा करुन वाद घालण्यास सुरुवात केली. मोटारचालक तरुणाला मारहाण केली. त्याला शस्त्राचा धाक दाखविला, तसेच परिसरात दहशत माजविली. मोटारचालक तरुणाच्या कानातील बाळी काढून घेतली. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक फाटे तपास करत आहेत.