लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : देशातून होणाऱ्या हळद निर्यातीत वाढ झाली आहे. अरबी देशांसह अमेरिका आणि युरोपीय देशांतून मागणी वाढल्यामुळे आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये देशातून १ लाख ७० हजार ८५ टन हळदीची निर्यात झाली आहे. सन २०२१-२२च्या तुलनेत १७ हजार टनांनी निर्यातीत वाढ झाली आहे.

सांगलीतील कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी म्हणाले, की देशातून एकूण हळद उत्पादनाच्या सरासरी १३ टक्के हळद दर वर्षी निर्यात होते. सन २०२१-२२मध्ये १८ टक्क्यांवर गेली होती, तर २०२२-२३मध्ये हळद निर्यात २० टक्क्यांपर्यंत गेली आहे. सन २०२०-२१मध्ये देशातून एक लाख ८३ हजार ८६८ टन हळदीची निर्यात झाली होती, पण २०२१-२२मध्ये पोषक स्थिती नसल्यामुळे निर्यातीत ३१ हजार टनांनी घट झाली होती. मागील वर्षात निर्यातीत झालेली वाढ हळद उत्पादकांना दिलासा देणारी आहे.

आणखी वाचा-प्राध्यापक भरती प्रक्रिया लांबणीवर;अर्जांसाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

जागतिक पातळीवर भारतात हळद उत्पादनात भारत अग्रेसर आहे. देशात महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात हळदीचे उत्पादन होते. देशातील एकूण उत्पादनात राज्याचा वाटा पन्नास टक्के आहे. मागील काही वर्षांपासून भारतातून प्रामुख्याने अमेरिकेसह युरोपीय देश, सौदी अरेबिया, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, जपान यासह अनेक देशांत हळदीची निर्यात होते.

अमेरिका आणि युरोपला उच्च दर्जाच्या हळदीची निर्यात होते. तुलनेने अरबी देश, आग्नेयेकडील देशांना मध्यम प्रतीच्या हळदीची निर्यात होते. अरब देशांत मसाल्याचा पदार्थ म्हणून हळदीचा वापर होतो. अमेरिका आणि युरोपीय देशांत वास्तव्य करीत असलेल्या भारतीयांकडून मसाल्याचा पदार्थ म्हणूनच हळदीला जास्त मागणी आहे. त्या खालोखाल सौंदर्य प्रसाधने, हर्बल उत्पादने, आयुर्वेदिक उत्पादने आणि औषधांमध्ये हळदीचा वापर वाढला आहे.

आणखी वाचा-मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला २ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

हळद निर्यातीवर दृष्टिक्षेप

वर्षनिर्यात (टनात)उलाढाल (कोटीत)
२०१९-२०१,३७,६५०१२८६
२०२०-२११,८३,८६८१७२२
२०२१-२२१,५२,७५८१५३४
२०२२-२३१,७०,०८५१६६६

विदर्भ, मराठवाड्यात क्षेत्र वाढले

मागील वर्षी निर्यातीसाठी हळदीला मागणी वाढली होती. त्यामुळे दरातही तेजी राहिली. देशाच्या एकूण हळद उत्पादनात राज्याचा वाटा पन्नास टक्के आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हळदीचे क्षेत्र वाढले असून, राज्याच्या एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के उत्पादन विदर्भ आणि मराठवाड्यात होते आहे, अशी माहिती सांगली येथील हळदीचे व्यापारी गोपाळ मर्दा यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in turmeric exports know here which countries demand increased pune print news dbj 20 mrj