इंदापूर: उजनी धरणामध्ये मुजोर झालेल्या वाळू माफीयांचे अवैध वाळू उपसण्याचे सत्र सुरूच असून या दीड महिन्यामध्ये आज प्रशासनाने चौथ्यांदा कारवाई करून वाळू माफियांच्या भर दिवसा १३ बोटी जिलेटिनचा स्फोट घडवून फोडल्या. वाळू माफियांवरची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. या कारवाईसाठी पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांचे महसूल व पोलीस प्रशासन मोठा फौजफाटा घेऊन उजनी धरणामध्ये कारवाईसाठी आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भर दिवसा उजनीतील ‘काळ्या सोन्या’वर डल्ला मारणाऱ्या वाळू माफीयांच्या एका पाठोपाठ १३ बोटी फोडून नष्ट करण्यात आल्या. आज उजनी धरणाचा परिसर बोटीत घडवून आणलेल्या स्फोटाने अक्षरशः दणाणून गेला. उजनी धरणामध्ये आज दिवसभर जणू युद्धजन्य परिस्थिती सुरू होती. बोटीत केलेल्या स्फोटाने परिसर हादरून जात होता. उजनी जलाशयात या दिवसांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांची मोठी मांदियाळी असते. देशा- विदेशातून विविध जाती प्रजातीचे पक्षी विणीच्या हंगामासाठी उजनीच्या परिसरात येतात. या पक्ष्यांच्या अधिवासात वाळू माफियांचा दररोज धुडगूळ सुरू असतो.

आज सातत्याने होणाऱ्या या स्फोटाने पक्षी जगत अक्षरशः हादरून गेले होते . स्फोटाच्या आवाजाने जीव मुठीत धरून जीव वाचवण्यासाठी त्यांची होणारी धडपड युद्धजन्य परिस्थितीची आठवण करून देत होती. उशीरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरूच होते. वारंवार वाळू माफियांच्या बोटी फोडून नष्ट केल्या जात असताना दुसऱ्याच दिवशी वाळू माफीये वाळू उपसण्याची यंत्रणा सज्ज करीत असल्याचे स्पष्ट झाले असून, या वाळू माफियांना वरदहस्त नेमका कोणाचा आहे ? असा सवाल जनसामान्यांमधून विचारला जात आहे.

उजनी धरणामध्ये गेल्या ४५ वर्षापासून साचलेला मोठा वाळू साठा उपलब्ध असून गेले अनेक दिवस उजनी मध्ये वाळूची तस्करी सुरू असून या वाळू माफियांवर कारवाई करता करता प्रशासन जेरीस आले आहे. आज पुणे व सोलापूर या दोन जिल्हा पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करून तेरा बोटी फोडल्या असल्या तरी एकाच दिवसात पुन्हा वाळू माफीयांची यंत्रणा सज्ज राहण्याची शक्यता असल्याचे आजच्या चौथ्या कारवाईने उघड झाले आहे. आज पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे , सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सामान्य प्रशासन तहसीलदार श्रीकांत पाटील व,इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वात महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील माळवाडी जॅकवेल , ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे पाठलाग करून वाळू माफियांच्या १३ बोटीं पकडल्या .व त्या सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या तसेच माळवाडी जॅकवेल जवळ तीन सक्शन बोट पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई मध्ये इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, करमाळा निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे, इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडी मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, काटीचे मंडल अधिकारी मल्लाप्पा ढाणे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, भूषण सुरवडकर तसेच तहसील कार्यालय करमाळा येथील सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र कदम, ग्राम महसूल आधिकारी चंद्रकांत नावाडे, गोरक्षनाथ ढोकणे, यादव, ठोंबरे, मंगलसिंग गुसिंगे, इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील सुनील राऊत, प्रदीप भोई, अरुण कांबळे , विजयकुमार करे व बाळासाहेब कडाळे तसेच पोलीस कर्मचारी विनोद रासकर, लक्ष्मण सूर्यवंशी , होमगार्ड गणेश वडवे, भारत लोखंडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील ड्रोन सर्व्हेअर संकेत बाबर यांनी भाग घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indapur sand mafia 13 boats blasted by revenue department in ujani dam pune print news css