एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे नदीवर बर्फाची चादर असते तशीच अवस्था सध्या इंद्रायणी नदीची झालेली आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे, आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात फेसच-फेस दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित का झाली आहे? असा प्रश्न नदी पाहिल्यानंतर पडला आहे. सोशल मीडियावर इंद्रायणी नदीचा फेसाळलेला व्हिडिओ व्हारल होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने इंद्रायणी नदी च्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. इंद्रायणी प्रदूषणावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळंदीत वारकऱ्यांनी दिला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आळंदीत काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला आले होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना महेश महाराज मडके या युवकाने इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा मांडला होता. तेव्हा मुख्यमंत्री यांनी नदी स्वच्छतेचे आश्वासन दिले होते. मात्र इंद्रायणी नदीची परिस्थितीमध्ये फरक पडलेला नाही. कालपासून इंद्रायणी नदी पात्रात फेसच फेस सगळीकडे दिसतो आहे. इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचा दर्शन घेतात. परंतु, सध्या नदीची दिसत असलेली अवस्था बघता लाखो वारकरी आणि आळंदीत ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून इंद्रायणी प्रदूषणमुक्त करावी असे आवाहन वारकरी करत आहेत. 

हेही वाचा… प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ भूमिकेबद्दल आभार – चंद्रकांत पाटील

प्रदूषणबाबत असाही तर्क

ड्रेनेज, सांडपाणी नदीत प्रक्रिया न करता थेट सोडल्याने फेस होऊ शकतो असा तर्क अधिकाऱ्यांनी लावला आहे. सांडपाण्यात डिटेरजेन्ट असते यामुळं बंधाऱ्यावरून खाली पाणी पडताच तिथं फेस येतो असं नाव न लिहिण्याचा अटीवर एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

पाण्याच्या नमुन्याची तपासणी सुरु

रामदरी, मोई, मोशी, चिंबळी, डुडूळगाव आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. चिंबळी येथे बंधाऱ्यावरून पाणी पडत असल्याने तिथं काही अंतरावर फेस आढळला आहे. प्रक्रिया न करिता थेट सांडपाणी सोडल्याने हा फेस होतो, त्यात डिटेर्जेन्ट असते असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indrayani river polluted due to unknown reason maharashtra pollution control board took samples for test kjp 91 asj
First published on: 28-01-2023 at 10:16 IST