पुणे : कराड येथील यशवंत सहकारी बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यावर केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चरेगावकर हेही भाजपशी संबंधित आहेत. ते राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष असून, एका ज्येष्ठ मंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

‘यशवंत सहकारी बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा झाला असून, त्यामध्ये शेखर चरेगावकर यांचा मुख्य सहभाग आहे. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केली असून, लेखापरीक्षण अहवालातही घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत चौकशी करून शेखर चरेगावकर यांच्यासह दोषी संचालकांना अटक करावी,’ अशी मागणी खासदार कुलकर्णी यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ‘बँकेच्या २३० कोटींच्या ठेवी आहेत. मात्र, गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आल्या आहेत. बँकेतील आर्थिक अनियमिततेबाबत तीन अहवाल आले आहेत. या संदर्भात माझ्या संपर्कात असलेल्या ठेवीदारांना शेखर चरेगावकर यांचे बंधू शार्दूल यांच्याकडून धमकावले जात आहे. सहकार खात्यातील अधिकाऱ्यांवरही कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे,’ असे त्या म्हणाल्या. ‘मलाही ‘या प्रकरणात गप्प बसा, अन्यथा तुमचे गेल्या वेळी तिकीट कापले, तसे पुढेही पाहून घेऊ,’ अशी धमकी दिली गेली,’ असा आरोप खासदार कुलकर्णी यांनी केल्याने या सर्व प्रकरणाला आता भाजपअंतर्गत संघर्षाचे वळण लागल्याचे मानले जाते.

कुलकर्णी यांनी कराडमध्येही गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन चरेगावकर यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर चरेगावकर यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन कुलकर्णी यांचे सर्व आरोप फेटाळले होते. तसेच, कोणत्याही चौकशीला सामारे जाण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले होते.

बँक थकबाकीदारांमुळे अडचणीत आल्याने मेधा कुलकर्णी यांनी थकीत कर्जदारांना पाठीशी घालू नये. वस्तुस्थिती जाणून घेऊन बँकेस सहकार्य करावे. ठेवीदारांनी खोट्या प्रचाराला बळी न पडता बँकेच्या प्रशासनावर विश्वास ठेवावा. ठेवीदारांचा प्रत्येक रुपया परत देण्यास बांधील असून, सहा महिन्यांतच बँक पूर्वपदावर आणू.महेशकुमार जाधवअध्यक्ष, यशवंत सहकारी बँक

हा भाजप किंवा व्यक्तिगत पातळीवरील संघर्ष असल्याचा समज चुकीचा आहे. लोकांना फसविणारी व्यक्ती योगायोगाने भाजपशी संबंधित आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना या संदर्भात सोमवारी भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. ते या प्रकरणाची दखल घेतील, असा विश्वास आहे. मेधा कुलकर्णीखासदार

बँकेत कोणतेही गैरव्यवहार अथवा बँकेवर दोषारोप झालेले नसून, ठेवीदारांचे पैसे व्याजासह देण्यासाठी संचालक मंडळ सक्षम आहे. केंद्रीय अन्वेषण विभागासह (सीबीआय) कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. शेखर चरेगावकर माजी अध्यक्ष, यशवंत सहकारी बँक

(कराडमध्ये नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका)