पुणे : अटल सेतूला पडलेल्या भेगा मी पाहिल्या. केवळ या सेतूच्या कामाचीच नाही, तर राज्य सरकारने केलेल्या सर्वच मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांची चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केली. खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर सुळे यांनी प्रथमच पक्ष कार्यालयाला शनिवारी भेट दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहराध्यक्ष प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की अटल सेतूचे काम निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. या सरकारने घाईने कोट्यवधींचे प्रकल्प केले. त्याचा हा परिणाम आहे. या सरकारने केलेल्या अशा सर्वच मोठ्या कामांची चौकशी लावायला हवी. राज्यात पेपरफुटी झाली, शेतकऱ्यांना फसविण्यात आले, बेरोजगारांना काम मिळत नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत. अशी कोणती गोष्ट आहे, की त्यावर हे सरकार चांगले काम करत आहे? मुलींना विनामूल्य शिक्षण या विषयावर पालकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे, मी स्वतः त्यात सहभागी होईन. मुलींना विनामूल्य शिक्षण ही घोषणा राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी केली. त्याचे पुढे काहीच झाले नाही. सर्व पालकांना पैसे जमा करावेच लागले.

हेही वाचा : काँग्रेस भवनात झाडाझडती, हाणामारी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

राज्यातील जातीय संघर्षाला हेच सरकार जबाबदार आहे. केंद्राने जनगणनाच केली नाही. ती झाली नाही म्हणून समोर कसलीही आकडेवारी नाही. मग कशाच्या आधारावर आरक्षण जाहीर केले जाते. घटनेत दुरुस्ती हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. यापूर्वी सरकार त्यांचेच होते, आता संख्या कमी झाली, तरीही त्यांचेच सरकार आहे. पण ते दुरुस्ती करत नाहीत. कारण त्यांना भांडणेच लावायची आहेत, असेही सुळे यांनी या वेळी सांगितले.