जेजुरी : बाजारात चकलीची विविध उत्पादने उपलब्ध असली, तरी जेजुरीच्या चकलीवाल्या बारभाई काकूंच्या चकलीला मागणी असते. मशिनऐवजी घरगुती पद्धतीने भाजणीचे पीठ मळणे आणि ग्राहकांच्या समोरच चकली तयार करण्यात येत असल्याने जेजुरीसह जिल्ह्यातून या चकलीला मागणी वाढत चालली आहे.

जेजुरीतील संजीवनी दत्तात्रय बारभाई या महिला उद्योजकांनी २० वर्षांपूर्वी या व्यवसायाला सुरुवात केली. ‘चकलीवाल्या बारभाई काकू’ अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे पती खंडोबाचे पुजारी आहेत. प्रपंचाला हातभार लागावा म्हणून संजीवनी बारभाई यांनी जेवणाचे डबे देण्याचा व्यवसाय सुरू केला. हे करताना एका दिवाळीत त्यांनी २० किलो भाजणीची चकली तयार केली. ही चकली चविष्ट व कुरकुरीत झाल्याने लगेचच त्याची विक्री झाली. त्यानंतर त्यांनी वर्षभर चकली व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्या चकली बनवत राहिल्या. या दिवाळीत तर त्यांना तब्बल ४०० किलो चकलीची ऑर्डर मिळाली आहे.

ग्राहकांच्या समोरही चकली तयार करून विक्री केली जात असल्याने या चकलीला मागणी असते. या कामात त्यांचे कुटुंब मदत करत असते. जेजुरी परिसरातील अनेक कुटुंबे, खंडोबाला येणारे भाविक आवर्जून चकली घेऊन जात असतात. वर्षभर चकलीचे उत्पादन सुरू असते. दिवाळीत बारभाई यांच्या चकलीला मागणी असते. ६३ वर्षांच्या बारभाई या चकली तळण्याचे काम आजही स्वतः करत असतात. सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत त्यांचे काम सुरू असते.

याबाबत संजीवनी बारभाई म्हणाल्या,‘ व्यवसायात सचोटी आणि गुणवत्ता महत्त्वाची असते. दरवर्षी घरगुती भाजणीची चकली मोठ्या प्रमाणात बनवते. आता बाजारात भाजणीचे पीठ मळणे, चकली तयार करणे याच्या मशीन आल्या ओहत. मात्र, आम्ही घरगुती पद्धतीनेच चकली बनवतो. त्यामुळे ही चकली चवदार आणि कुरकुरीत होते. ग्राहकांना ती पसंत पडते. स्पर्धेची आम्ही काळजी करत नाही. आता महिलांना बरोबर घेऊन लघुउद्योग सुरू करण्याचा मानस आहे.’

मशिनचा वापर न करता घरगुती पद्धतीने ग्राहकांसमोरच चकल्या तयार करण्यात येतात. त्यामुळे चकलीला मागणी असते. जेजुरीसह पुणे जिल्ह्यातून मागणी असते. आता महिलांना बरोबर घेऊन हा व्यवसाय वाढविण्याचा मानस आहे. – संजीवनी दत्तात्रय बारभाई, जेजुरी.