प्रकाश खाडे, जेजुरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेजुरी, वार्ताहर : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळावर सातपैकी बाहेरील पाच विश्वस्त नेमल्याने जेजुरीमध्ये संतप्त वातावरण निर्माण होऊन ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं होतं. आज आंदोलनाचा १३ वा दिवस होता. या आंदोलनामध्ये सर्व जेजुरीकर सहभागी झाल्याने त्याची व्याप्ती वाढत चालली होती. खांदेकरी – मानकरी ग्रामस्थ मंडळातर्फे पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्याकडे जेजुरीच्या रुढी, परंपरा, सण – उत्सवाची माहिती असलेले स्थानिक विश्वस्त नेमावेत यासाठी विनंती अर्ज करण्यात आला होता. सध्याचे विश्वस्त ७ असून यामध्ये चार स्थानिक विश्वस्तांची अधिक नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी सहधर्मादाय आयुक्त यांनी मान्य केली व तसा ठराव करून देण्याचे आदेश नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाला दिले आहेत. आंदोलन मागे घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

स्थानिक चार ग्रामस्थांना विश्वस्त म्हणून नेमले जाणार असल्याची बातमी गावात येताच ग्रामस्थांनी फटाके वाजवून भंडारा उधळीत आनंद साजरा केला. आंदोलन संपल्याने जेजुरीतील तणाव निवळला आहे.

श्री खंडोबा देवाचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देव संस्थान समितीच्या सर्व विश्वस्तांनी आज जेजुरीत येऊन आंदोलकांशी चर्चा केली. जेजुरीकर ग्रामस्थांच्या भावना आम्हाला समजल्या असून आम्ही सर्वजण स्थानिक चार विश्वस्त नेमण्यासाठी सहकार्य करू, आवश्यक ती सर्व न्याय प्रक्रिया पार पाडू असे मुख्य विश्वस्त पोपट खोमणे यांनी सांगितले.

यावेळी विश्वस्त विधीज्ञ पांडुरंग थोरवे, राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, अभिजीत देवकाते, विश्वास पानसे, अनिल सैंदाडे उपस्थित होते. विश्वस्त मंडळ बैठकीमध्ये जेजुरीतील स्थानिक चार विश्वस्त घेण्याचा ठराव करणार असून सोमवारी याबाबत सहधर्मादाय आयुक्त पुढील आदेश देणार आहेत.

हे ही वाचा >> “ऐकलं तर ठीक, नाहीतर…”, कोल्हापुरातील तणावावरून मनसेचा कडक इशारा

जेजुरीकर ग्रामस्थांची विनंती सहधर्मादाय आयुक्तांनी मान्य केल्यामुळे जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले व आंदोलन समाप्त करण्यात आले. यावेळी माजी विश्वस्त संदीप जगताप, अजिंक्य देशमुख, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सुधीर गोडसे, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, जयदीप बारभाई, सचिन पेशवे, अलका शिंदे, विठ्ठल सोनवणे, किरण डावलकर, उमेश जगताप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jejuri villagers withdraw protest as martand devasthan trustee members will increased asc