पुणे : परदेशात राहणाऱ्या एकाच्या बंगल्यातून पलंगाखाली पुरलेल्या तिजोरीतून १४ लाखांचे दागिने चोरुन पसार झालेल्या चोरट्याला लोणी काळबोर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदीची विट असा नऊ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ४५, रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेसजवळ, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कल्याणी याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे. याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुवेतमधील एका तेल कंपनीत वित्त विभागात कामाला आहेत. लोणी काळभोर भागातील तरडे परिसरात त्यांनी चार गुंठे जागा खरेदी करून बंगला बांधला होता. ते सुटी घेऊन लोणी काळभोरमधील बंगल्यात वर्षातून तीन ते चार वेळा वास्तव्यास येतता. त्यांनी बंगल्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

त्यांनी शयनगृहातील पलंगाखाली एक तिजोरी केली आहे. या तिजोरीवर फरशी बसविण्यात आली आहे. या तिजाेरीत त्यांनी सोन्याचे दागिने आणि चांदीची वीट ठेवली होती. १ फेब्रुवारी रोजी ते कुवेतहून पुण्यात आले. बंगल्यात पोहोचले. तेव्हा बंगल्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. पलंगाखाली असलेल्या तिजोरीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तपास सुरू केला. ३१ जानेवारी रोजी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे लक्षात आले. तपासात सराइत चोरटा संगतसिंग कल्याणी आणि साथीदाराने बंगल्यातून ऐवज चोरल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या कल्याणीला पकडले. चौकशीत कल्याणी याच्याकडून घरफोडीचे ‌ नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस कर्मचारी गणेश सातपुते, संभाजी देवीकर, विलास शिंदे, सुनील नागलोत, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, राहुल कर्डिले, प्रदीप गाडे, चक्रधर शिरगोरे यांनी ही कामगिरी केली.संगतसिंगचा साथीदार पसार झाला आहे. त्याला बंगल्यातील तिजोरीची माहिती होती. त्याला अटक केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होईल, असे पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewelry thief arrested in loni kalbhor pune print news rbk 25 amy