पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायाधीश के. डी. शिरभाते २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.महेश दत्तात्रेय गोरडे (वय २५, रा. येवलेवस्ती, पिंपळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. पीडित मुलगी आणि आरोपी गोरडे यांची ओळख होती. फिरायला जाण्याचा बहाणा करुन आरोपीने २०२० मध्ये खेड तालुक्यातील जेरेवाडी फाटा परिसरात नेले. तेथील एका लाॅजवर त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. अत्याचारातून ती गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. नितीन कोंघे यांनी बाजू मांडली. या खटल्यात ‘डीएनए’ अहवाल महत्त्वाचा पुरावा ठरला. खटल्याची सुनावणी सुरू असताना काही साक्षीदार फितूर झाले., वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा दोषी ठरविले. त्याला २० वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.