पुणे : समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अटक केलेल्या महाविद्यालयीन युवतीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डाॅ. जी. आर. डोरनलपल्ले यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
युद्धजन्य परिस्थितीत समाज माध्यमात तेढ निर्माण करणाऱ्या, तसेच अफवा प्रसारित करणाऱ्या संदेशांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यातील हवालदार सुभाष जरांडे शुक्रवारी दुपारी पाेलीस ठाण्यात असताना, त्या वेळी या युवतीने समाज माध्यमात प्रसारित केलेला संदेश जरांडे यांनी पाहिला. तो आक्षेपार्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर शुक्रवारी रात्री तिला पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या युवतीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे. युवती वापरात असलेला मोबाइल संच तपासासाठी जप्त करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने तिला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.