पुण्यातल्या कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. अशात भाजपाचे हेमंत रासने हे जवळपास ७ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. सगळ्या फेऱ्या संपल्यानंतर अंतिम निकाल समोर आला आहे. हेमंत रासने यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी उमेदवार म्हणून कमी पडलो हे मला मान्य आहे. मी माझ्या परिने पूर्ण प्रयत्न केला होता. माझ्या मनात मी कमी पडल्याची भावना आहे असं हेमंत रासने यांनी म्हटलं आहे. तसंच अद्याप माझं वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही. कसबा हा भाजपाचा गड मानला जात होता. या ठिकाणी मुक्ता टिळक या आमदार होत्या. त्यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडली. टिळक घराण्यातल्या कुणाला तिकिट देण्याऐवजी भाजपाने हेमंत रासनेंना तिकिट दिलं होतं. आता हेमंत रासने यांचा पराभव होणं निश्चित आहे त्यामुळे भाजपाच्या हातून ही जागा निसटली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे हेमंत रासने यांनी?

२००९ पासून जर आपण पाहिलं तर हा तिरंगी मतदारसंघ होता. गिरीश बापट जिंकून आले तेव्हा त्यांना ५४ हजार मतं मिळाली होती. ९२ हजार मतं तेव्हाही विरोधी मतं पडली होती. जो निकाल समोर येतोय त्याचं मला आत्मचिंतन करावं लागेल आणि मी कुठे कमी पडलो हे मला शोधावं लागेल. सत्ता आमची आहे म्हणून आमचे मंत्री दिसतात. मात्र विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठीही अनेक दिग्गज आलेच होते. पराभव होताना दिसतो आहे. मी बुथवाईज सगळी आकडेवारी पाहणार आहे. जिथे आम्ही कमी पडलो तिथे आम्ही पुढच्या वेळी काम करू असं हेमंत रासने यांनी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांशी, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करता येईल. मी घरोघरी जाऊ शकत नव्हतो, पण आमची यंत्रमा घरोघरी गेली होती. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे घडलेलं नाही. नाराजीचा फार फरक पडला असं मला वाटत नाही. मी कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. मला यावर थोडं चिंतन करावं लागेल. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. मला विजयाची खात्री होती.

मागच्या पाच टर्म टिळक बापट यांच्या पाठिशी उभे असलेले मतदार तुमच्या पाठिशी का नाहीत? असं विचारलं असता हेमंत रासने म्हणाले याबाबत मला माहिती घ्यावी लागेल. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला. पण मी उमेदवार म्हणून मी कमी पडलो असं मला म्हणायचं आहे. मला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. पक्षाने विश्वास दाखवला होता. त्यामुळे जिंकून येणं ही माझीच जबाबदारी होती मात्र त्यात मी कमी पडलो असं हेमंत रासने यांनी म्हटलं आहे. तसंच तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरीही मी उमेदवार म्हणून कमी पडलो हेच मी सांगणार आहे.

याआधी झालेल्या निवडणुका तिरंगी आणि सहारंगी झाल्या. मात्र पहिल्यांदाच ही निवडणूक दुरंगी झाली आहे. त्याचा काहीसा फटका बसला असावा असं मला वाटतं असंही हेमंत रासने यांनी म्हटलं आहे. मुक्ता टिळक यांचं कर्करोगाने झालं. त्यानंतर पुण्यातल्या कसबा पेठ मतदार संघात पोटनिवडणूक पार पडली. ही निवडणूक जिंकणं निश्चित असल्याने काँग्रेसने घोषणाबाजीही करायला सुरूवात केली आहे. कसबा तो झाकी है महाराष्ट्र बाकी है अशाही घोषणा दिल्या जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba peth by poll result what hemant rasane said about result first reaction scj