पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जोरदार पाऊस कायम राहिल्याने खडकवासला टेमघर आणि पानशेत धरणातून विसर्गाला सुरूवात झाली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ४ हजार १७० क्युसेक विसर्गात मंगळवारी सकाळी अकरा वाजता ७ हजार ५६१ क्युसेक एवढा करण्यात आला आहे. हा विसर्ग आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे.
पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणामधून नदी पात्रामध्ये सुरू असणारा ३ हजार ९९६ क्युसेक विसर्ग वाढवून सांडव्याद्वारे ५ हजार ९०८ क्युसेक आणि विद्युत निर्मिती केंद्र द्वारे ६०० क्युसेक असा एकूण ६ हजार ५०८ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात अधिक पर्जन्यवृष्टी होत असून टेमघर धरणाच्या जलाशयात ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता आणि धरणात येवा वाढत असल्याने तसेच टेमघर धरण द्वारविरहित असल्याने धरणाच्या सांडव्यावरून अनियंत्रित पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होऊ शकण्याची भीती आहे. त्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्राद्वारे ३०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात चालू करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आल्याने मुठा नदी काठच्या सर्व नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे आणि तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.