पुण्यात अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत अधिकारी झालेल्या अहमदनगरच्या दर्शना पवारच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या स्थितीत आढळला. आता तिच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे झाले आहेत. यातून सुरुवातीला संशयास्पद वाटणारा हा मृत्यू आता हत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची दर्शना पवार आठ दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलीस तक्रारही दिली होती. यानंतर आता पोलिसांना तिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला. काही दिवसांपूर्वीच दर्शनाला एमपीएससी परीक्षेत यश मिळालं होतं आणि तिची वन खात्यात अधिकारी म्हणून निवड झाली होती. निकालानंतर ती एका सत्कार कार्यक्रमासाठी गेली आणि त्यानंतर बेपत्ता झाली.

शवविच्छेदन अहवालात नेमकं काय?

पोलिसांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालात दर्शना पवारची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा झालेल्या आढळल्या आहेत. यानुसार वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आहेत. विविध पोलीस पथकं आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : “सुरक्षारक्षक तिच्या रुममध्ये जायचा आणि…”, विवस्त्र मृतदेहप्रकरणी भावाचे गंभीर आरोप, म्हणाला…

संशय कुणावर?

दर्शना पवार सत्कार कार्यक्रमानंतर राहुल हंडोरे नावाच्या मित्राबरोबर ट्रेकिंगला गेल्याचं समोर आलं आहे. तपासात दर्शना आणि तिचा मित्र राहुल ट्रेकिंगला जाताना सीसीटीव्हीत दिसले आहेत. मात्र, परत येताना राहुल एकटाच दिसला. त्यामुळे त्याच्यावर संशयाची सुई गेली आहे. मात्र, राहुल हंडोरेही बेपत्ता आहे. त्याच्या कुटुंबानेही तो बेपत्ता असल्याची पोलीस तक्रार दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know important facts of postmortem report of mpsc pass darshana pawar pbs