पुणे : कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला गुंड नीलेश घायवळ ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र मिळविले आहे. या पारपत्र प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करीत आहेत. तत्काळ पारपत्र मिळविताना पोलीस पडताळणीमधून घायवळ सुटला कसा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोथरूड भागात १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मित्राबरोबर गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर घायवळ टोळीतील सराइतांनी पिस्तुलातून गोळीबार केला होता. गोळीबारानंतर सराइतांनी परिसरात दहशत माजवून आणखी एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक केली. गोळीबार आणि दहशत माजविल्याप्रकरणी नीलेश घायवळसह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवले. पारपत्र मिळविल्यानंतर तो स्वित्झर्लंडला पसार झाला. त्याने ९० दिवसांचा व्हिसा मिळविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे.
दरम्यान, पारपत्र मिळविताना आवश्यक पोलीस पडताळणी अहिल्यानगर येथील पोलिसांनी केली. ती करताना घायवळच्या बाबतीत काहीच वावगे पोलिसांना कसे आढळले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घायवळ मूळचा अहिल्यानगरमधील जामखेडचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी तो परदेशात पसार झाल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
नीलेश घायवळने अहिल्यानगरमधून पारपत्र मिळविले आहे. तो स्वित्झर्लंडमध्ये पसार झाला आहे. त्याने पारपत्र कसे मिळवले, यादृष्टीने पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल. पुणे पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीसही बजावली आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा
गोळीबारप्रकरणी घायवळसह साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरल्याप्रकरणी घायवळविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात सोमवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली. एका तरुणाने तक्रार दिली आहे. तरुणाच्या मोटारीच्या क्रमांकाचा वापर कोथरूडमधील एका दुचाकीस्वाराने केला होता. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर दुचाकीचा मालक नीलेश घायवळ असल्याचे समोर आले.