पुणे : रंगकाम करताना इमारतीतून पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड भागात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून न देता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जगतमुरत गुलाब निषाद (वय ३०, रा. केळेवाडी, कोथरूड, मूळ रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार अडागळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील रामबाग काॅलनीत असलेल्या एका सोसायटीचे रंगकाम करण्याचे काम ठेकेदारांना देण्यात आले होते. २० एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर निषाद रंगकाम करत होता. त्या वेळी तोल जाऊन पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलीस तपासात ठेकेदाराने सुरक्षाविषयक साधने पुरविली नसल्याचे उघडकीस आले.