पुणे : ‘आषाढी एकादशीला पाडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दर वर्षी पंढरपूरला येतात. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदा दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत,’ असे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी सांगितले.

राज्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त ‘वारकरी भक्तियोग’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी औसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय पूजा करण्यात येणार आहे. यंदा वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक सुरक्षा कर्मचारी, कमांडो पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दर्शनासाठी लागणाऱ्या रांगांमध्ये सुविधा देण्यात येणार असून, वारकऱ्यांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे,’ असे औसेकर यांनी सांगितले.

‘व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला असून, काही महत्त्वाचे सेवेकरी आणि मठकऱ्यांच्या चोपदार, टाळकरी आणि सहकाऱ्यांना दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांची संख्याही अत्यल्प आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.