नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ओतूर-चिल्हेवाडी रस्त्यावर बिबट्याने हल्ला केल्याने दोन दुचाकींवरून प्रवास करणारे तिघे जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी पावणेआठ वाजता ही घटना घडली. डालचंद्र लेखराज सिंग (वय ४०, रा. ओतूर), लक्ष्मण बबन गोंदे (वय ३७ रा. गोंदेवाडी) आणि ईश्वर रामदास जाधव (वय ४३, रा. अहिनवेवाडी, ता. जुन्नर) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार, ओतूर-चिल्हेवाडी रस्त्यावरील शेटेवाडी पाटाजवळ एक मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जात असताना मादीने अचानक झडप घालत हल्ला केला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या घटनेनंतर जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक दाखल झाले. जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील दवाखान्यात हलविण्यात आले. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. शेटेवाडी परिसरात मादी आणि तिचे बछडे वारंवार दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.