Elevator Accident : पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्हाेलीत एका इमारतीच्या उद्ववाहकात (लिफ्ट) अडकून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्याच आठवड्यात घडली. या सोसायटीत जुन्या पद्धतीचे उद्ववाहक आहे. तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात असताना सायंकाळी ही दुर्घटना घडली.
उद्ववाहकाचा दरवाजा आणि लोखंडी पट्ट्यांच्या मधोमध हा मुलगा अडकला. त्याचा आवाज ऐकून रहिवाशांनी धाव घेतली. त्याची सुटका करण्यासाठी रहिवाशांनी प्रयत्नही केले. मात्र, त्यांचे प्रयत्न फोल ठरले आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
कोंढव्यातील उंड्री भागातील सोसायटीत २० मजली इमारतीत चौदाव्या मजल्यावरील सदनिकेत लागलेल्या आगीत तर्ष खेतान या पंधरावर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपरीतील ही घटना घडली. कोंढव्यात जी घटना घडली, त्या इमारतीतील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित नसल्याची धक्कादायक बाब अग्निशामक दलाच्या तपासणीत उघडकीस आली होती. त्याही घटनेत सदनिकेत आग लागल्यानंतर सुरुवातीला सोसायटीतील रहिवाशांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले होते.
आता चऱ्होलीतील घटनेतही उद्ववाहकात मुलगा अडकल्यानंतर या इमारतीतील रहिवाशांनी त्याची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दोन्ही घटनांत मुलांना वाचवणे शक्य झाले नाही.
चऱ्होलीतील घटनेनंतर उद्वाहकांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात गगनचुंबी इमारती आहेत. हल्ली बहुतांश इमारतींतील उद्वाहक सुविधा अत्याधुनिक पद्धतीच्या आहेत. पण, त्यांची नियमित देखभाल-दुुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.
उद्वाहक बसविणाऱ्या कंपनीतील अधिकृत तंत्रज्ञांकडून नियमित तपासणी आणि देखभाल करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी एकट्याने उद्वाहकाचा वापर करताना तर विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, उद्वाहक बंद पडणे, तांत्रिक बिघाड होणे, असे झाल्यास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक गोंधळून जातात.
आपत्कालीन परिस्थितीत उद्वाहकातील पॅनिक बटन, दूरध्वनी, माइक आदी यंत्रणांचा वापर करता येतो. मात्र, अनेकदा अशा यंत्रणाच बंद असतात. देखभालीअभावी त्या दुरुस्तच केल्या गेलेल्या नसतात. शिवाय, काही वेळा या यंत्रणा वापरण्याविषयीच्या सूचनाच तेथे लावलेल्या नसतात. उद्वाहकामध्ये बिघाड झाल्यास त्याची माहिती त्वरित संबंधित तंत्रज्ञांना देणे, ही रहिवाशांचीही जबाबदारी आहे.
इतके करूनही दुर्घटना घडली, तर अग्निशामक दलाला अशा प्रकारच्या घटनांची ताबडतोब माहिती देणे आवश्यक आहे. अशा आपत्कालीन परिस्थिती कशा हाताळायच्या, याचे प्रशिक्षण त्यांना दिलेले असल्याने त्यांची वेळेवर आलेली मदत जीव वाचवू शकते.
काही वर्षांपूर्वी रास्ता पेठेतील एका जुन्या इमारतीतील उद्वाहकात एका तरुणाचा हात अडकला होता. जुन्या पद्धतीच्या या उद्वाहकात हात अडकल्याने त्याचा हात तुटल्याची घटना घडली होती. सोसायटीत विविध प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा असतात. मात्र, सोसायटीतील अग्निशामक यंत्रणा, उद्वाहकाच्या नियमित देखभाल-दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष जिवावर बेतू शकते.
दुर्घटना नेमकी कधी आणि कशी घडेल, याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे सोसायटीतील उद्ववाहकाची नियमित काळजी घेतल्यास आणि देखभाल-दुरुस्ती केल्यास अशा जीवघेण्या दुर्घटना टाळता येतील.
rahul.khaladkar@expressindia.com