पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील दिवसाच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. दिवसभर उन्हाचा चटका, दुपारनंतर पावसाळी वातावरण आणि रात्री उकाडा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शनिवारीही (३ सप्टेंबर) शहरात संध्याकाळी जोरदार सरींनी हजेरी लावली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, शहरात आणखी दोन ते तीन दिवस हलक्या सरींची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : महंगाई पे हल्ला बोल ; काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली

पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यात दोन ते तीन वेळेला जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर सकाळपासून दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहत आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात अचानक वाढ नोंदिवली जात आहे. आठवड्यापूर्वी ३० अंश सेल्सिअसच्या आत असलेले तापमान सध्या ३४ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. शनिवारी शहरात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ५.९ अंश सेल्सिअसने अधिक होते. रात्रीचे किमान तापमान २० अंशांपुढे गेले आहे. शनिवारी ते सरासरीच्या तुलनेत १.३ अंशांनी अधिक २२.४ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे रात्री उकाडा जाणवत होता.

हेही वाचा >>> बनावट गुंठेवारी प्रकरणी पुणे , पिंपरी महापालिकेची फसवणूक उघडकीस ; १९ जणांविरोधात गुन्हे

शनिवारीही दुपारपर्यंत आकाश निरभ्र होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास आकाश ढगाळ झाले. त्यानंतर शहराच्या विविध भागांत हळूहळू पावसाला सुरुवात झाली. शहराच्या काही भागांत सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे संध्याकाळी घराबाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार रविवारीही संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light rain forecast continues in pune pune print news amy