पुणे : शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या लोकमान्यनगर येथील म्हाडाच्या इमारतींबाबत अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. येथील रहिवाशांनी स्वतः च्या घरांचा विकास स्वतः विकसक नेमून करण्याचे ठरवले आहे. मात्र कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यामध्ये खोडा घालत असल्याचा आरोप केला जात आहे. आमदार रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून येथील कामावर स्थगिती आणली. त्यामुळे येथील रहिवाशांच्या घरांचे पुनर्विकासाचे स्वप्न भंगले आहे. याचा निषेध करण्यासाठी लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने आमदार रासने यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लोकमान्यनगर येथील नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आमदार रासने यांच्या कार्यालयासमोर जमलेल्या नागरिकांनी हात निषेधाचे फलक घेतले होते. रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामुळे लोकमान्यनगर येथील पुनर्विकासाला खीळ बसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी रासने यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘ आमची स्वप्ने आम्हाला बघू द्या, आम्हाला गृहीत धरू नका, पुनर्विकासाला त्वरित मंजुरी द्या’. अशा घोषणांनी नागरिकांनी नातूबाग परिसर दणाणून सोडला.
आमदार रासने कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिक अजून संतप्त झाले. तब्बल अर्ध्या तासानंतर रासने आले. त्यानंतर झालेल्या संवादात आमदार हेमंत रासने आणि रहिवाशांमध्ये पाऊण तास शाब्दिक खडाजंगी झाली. ‘ आम्हाला आमची स्वप्नं साकार करू द्या, आमच्या घरांवर विकासकांवर आणलेले स्थगिती अगोदर उठवा’, मगच चर्चा अशी भूमिका घेत नागरिकांनी आमदार रासने यांना खडे बोल सुनावले.
आमदार रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामुळे लोकमान्यनगर पुनर्विकासाला खीळ बसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. आमदार रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेले पत्र मागे घेऊन कामावर देण्यात आलेली स्थगिती तातडीने उठवावी, असे निवेदन नागरिकांनी आमदार रासने यांना दिले. याबाबत आमदार हेमंत रासने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, केवळ लोकमान्यनगरचा नव्हे तर संपूर्ण कसबा मतदार संघांतील जीर्ण झालेल्या सोसायट्या यांचा विकास करायचा आहे. लवकरच यावर तोडगा निघेल. नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. या भागाचा एकात्मिक विकास झाला पाहिजे, असेच शासनाचे धोरण असून लवकरच सर्व प्रश्न मार्गी लागतील.