पिंपरी- चिंचवड: लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अखेर भुशी धरण शंभर टक्के भरले आहे. दरवर्षी पर्यटकांना भुशी धरण भरण्याची आतुरता असते. यावर्षी मान्सून वेळेआधीच दाखल झाल्याने अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. लोणावळ्यामध्ये देखील गेल्या २४ तासात १४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण्याच्या पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने ३१ ऑगस्ट पर्यंत लोणावळ्यातील काही पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामध्ये भुशी धरणाचा देखील समावेश आहे. या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी मावळमधील कुंडमळा येथे घडलेल्या घटनेमध्ये पन्नासहून अधिक जण जखमी झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अखेर भुशी धरण शंभर टक्के भरले आहे. दरवर्षी पर्यटकांना भुशी धरण भरण्याची आतुरता असते.
— LoksattaLive (@LoksattaLive) June 16, 2025
(व्हिडीओ क्रेडिट – लोकसत्ता टीम)#Lonavala #BhushiDam #Overflow #Bhushidam pic.twitter.com/0sHqGQZet9
पर्यटकांनी सुरक्षित पर्यटन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशातच आता लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईसह पुण्यामधील सर्वात जास्त पर्यटके भुशी धरणावर दाखल होतात, लोणावळ्यातील पर्यटनाचा आनंद घेत असतात.