पुणे : ‘दिल्लीमध्ये नुकताच करण्यात आलेला ‘क्लाउड सीडिंग’ (कृत्रिम पाऊस) हा पूर्णतः प्रायोगिक स्वरुपाचा उपक्रम होता. प्रत्येक प्रयोगाचे काही सकारात्मक आणि काही नकारात्मक परिणाम असतात. मात्र, अशा चाचण्या वैज्ञानिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने, तसेच आपल्या आकलनात भर घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात,’ असे मत पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी व्यक्त केले.

दर हिवाळ्यात दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ढासळून प्रचंड धुरके निर्माण होते. अशा वातावरणामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात, तसेच दृश्यमानता कमी होऊन त्याचा वाहतुकीवरही परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आयआयटी कानपूरसह सप्टेंबरमध्ये एक करार केला. या करारांतर्गत कृत्रिम पावसाद्वारे दिल्लीतील वायूप्रदूषण कमी करण्याचा उद्देश होता. त्यानुसार आयआयटी कानपूरने त्यांच्या सेस्ना २०६ एच विमानाद्वारे २८ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील बुराडी, मयूर विहार, उत्तर करोल बाग अशा भागांमध्ये ‘क्लाऊड सीडिंग’ केले. मात्र, त्याचा काहीच परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे या प्रयोगाबाबत मोठी चर्चा आहे. दिल्लीत कृत्रिम पावसाचा प्रयोग या पूर्वी दोन वेळा करण्यात आला होता. १९५७, १९७१-७२मध्ये प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे ५३ वर्षांनी पुन्हा दिल्लीत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. तर, आयआयटीएमने या पूर्वी कृत्रिम पावसाबाबत दीर्घ काळ अभ्यास करून त्याबाबतचा प्रयोग यशस्वी केला आहे.

या अनुषंगाने आयआयटी कानपूरने भारतीय हवामान विभागाच्या (सहकार्याने केलेल्या ‘क्लाउड सीडिंग’ प्रयोगाबाबत रविचंद्रन म्हणाले, ‘दिल्लीतील परिस्थिती लक्षात घेता अनेक संस्था आणि विद्यापीठे पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विविध प्रयोग करीत आहेत. अशा प्रयत्नांमधून आपण ज्ञान आणि अनुभव प्राप्त होते. एखादा प्रयोग यशस्वी होऊ शकतो किंवा अयशस्वी होऊ शकतो. मात्र, दोन्हीतील परिणाम वैज्ञानिकदृृष्ट्या महत्त्वाचे असतात. अपयशी ठरलेल्या प्रयोगातूनही वैज्ञानिक प्रगतीसाठी आवश्यक माहिती मिळते.’

‘पुण्यातील ‘आयआयटीएम’मध्ये उभारल्या जाणाऱ्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ अंतर्गत ‘क्लाउड चेंबर’ सुविधा विकसित केली जाणार आहे. या सुविधेमुळे वैज्ञानिकांना ढगांचे भौतिकशास्त्र समजून घेता येणार आहे. त्यात सिम्युलेशनची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याने नियंत्रित वातावरणात ढगांची निर्मिती आणि संबंधित वातावरणीय प्रक्रिया अभ्यासणे शक्य होणार आहे. अशा प्रयोगांमुळे ‘क्लाउड सीडिंग’ तंत्रांचा वापर करण्यापूर्वी संशोधकांना या तंत्रांचा अधिक बारकाईने अभ्यास करता येईल. करता येईल,’ असेही रविचंद्रन यांनी नमूद केले.