पिंपरी : औद्योगिकनगरीतील विविध नामांकित कंपन्यांसह लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये खंडेनवमीनिमित्त बुधवारी यंत्रसामग्रीचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. कारखान्यांमध्ये दुपारनंतर यंत्र, मशिनरींचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली. अनेक कंपन्यांमध्ये विविध स्पर्धा घेत खंडेनवमीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

पिंपरी-चिंचड शहराचा कामगारनगरी म्हणून नावलौकिक आहे. शहरात सुमारे ११ हजार लहान-मोठे उद्योग आहेत. खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रांचे पूजन करण्याची परंपरा आहे. यादिवशी यंत्रसामग्रीचे पूजन केले जाते. त्यामुळे शहरात खंडेनवमीला विशेष महत्त्व आहे. अलीकडे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार वाढत असला तरी या उत्सवाच्या परंपरेत कोणताही खंड पडलेला नाही. याउलट अनेक कारखान्यांमध्ये यंत्रपूजेबरोबरच सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा असे कार्यक्रम राबविले जातात.

बुधवारी सकाळपासून औद्योगिक परिसरातील भोसरीतील लांडेवाडी चौक, इंद्रायणीनगर चौक, गवळी माथा, पिंपरीतील यशवंतनगर, नेहरूनगर, चिंचवड येथील केएसबी चौक, थरमॅक्स चौक, आकुर्डी या ठिकाणी झेंडूची फुले, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी कारखानदारांची लगबग सुरू होती.

खंडेनवमीनिमित्त सर्वच लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये बुधवारी दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. वर्षभर ज्या यंत्रांवर हात राबतात, त्या यंत्रांची साफसफाई करण्यात सकाळपासून कामगार वर्ग दंग होता. कारखान्याच्या प्रवेशद्वारांवर झेंडूच्या माळांची आणि आंब्याच्या डहाळ्यांची तोरणे लावण्यात आली होती. महिला वर्गाकडून आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. यंत्रांची साफसफाई झाल्यानंतर फुलांची आरास करून यंत्रसामग्री तसेच परिसर सजविण्यात आला होता.

दुपारनंतर यंत्र, मशिनरींचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली. कामगारांचा उत्साह अवर्णनीय होता. व्यवस्थापन व कामगारांनी एकमेकांना शुभेच्छा देत खंडेनवमीचा आनंद द्विगुणित केला. शहरातील बजाज, एसकेएफ, ॲटलास काप्को, सँडविक एशिया, सेंच्युरी एन्का, थिसेनक्रुप यासह अनेक बड्या कंपन्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने यंत्रसामग्रीची पूजा करत खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.

‘रोबोट’चीही पूजा

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते यंत्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. सर्व उद्योजक व कामगार बांधवांनी आधुनिक युगातील रोबोट या यंत्राची देखील पूजा केली.