Pune metro services during Ganesh Visarjan महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनला (महामेट्रो) गणेश उत्सवात जादा सेवा पुरविल्याने चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता अनंत चतुर्थीनिमित्त दोन दिवस (६ आणि ७ सप्टेंबर) सलग ४१ तास रात्रंदिवस मेट्रो सेवा दिली जाणार आहे. या दरम्यान महामेट्रोच्या तब्बल १३९० फेऱ्या होणार असून त्यानुसार मेट्रो प्रशासनाने नियोजन केले आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्यानिमित्त ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पुणे मेट्रोच्या लाइन-१ (पर्पल लाइन-पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) आणि लाइन-२ (अक्वा लाइन-वनाझ ते रामवाडी) सलग ४१ तास सुरू राहणार आहेत. यामुळे मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक कोंडी टाळून भाविकांना गणपती दर्शन आणि विसर्जनासाठी सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
त्यासाठी मध्यवर्ती भागातील कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट येथील मेट्रो स्थानकांवर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी गर्दीच्या काळात (पीक अवर) मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या असून प्रति सहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल.
डिजिटल तिकीट सुविधा
तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी महामेट्रोने पुणेकरांना पुणे मेट्रो ॲप, डिजिटल तिकीट आणि ‘वन पुणे कार्ड’चा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रवाशांना त्वरित तिकीट मिळेल आणि वेळेची बचत होईल.
मनुष्यबळ : सध्या दोन पाळींमध्ये मनुष्यबळ कार्यरत आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा अतिरिक्त वाढविण्यात आल्या आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.
सुरक्षा : विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्यासाठी मेट्रोने गर्दी होत असल्याने मेट्रोच्या डब्यांमध्ये आणि परिसरात सीसीटीव्ही तसेच अतिरिक्त सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
फेऱ्या : मेट्रो मार्गिक एक वरून येणाऱ्या-जाणाऱ्या मिळून ८६४ फेऱ्या, तर दुसऱ्या दिवशी ५४४ अशा एकूण १३९० फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
दोन दिवस सलग मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने मेट्रो स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. कसबा आणि पीएमसी ही मेट्रो स्थानके उतरण्यासाठी तर मंडई स्थानक परतीच्या प्रवासासाठी असेल. गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी प्रथम मेट्रोतून उतरणाऱ्यांना प्राधान्य द्यावे जेणेकरून सुकर प्रवास करता येणे शक्य होईल.– चंद्रशेखर तांभवेकर, अतिरिक्त महासंचालक, महामेट्रो, पुणे