पुणे : राज्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत दहा फेऱ्या राबवण्यात आल्यानंतर आता शेवटची संधी म्हणून अकरावी फेरी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या फेरीसाठी ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान नोंदणी करावी लागणार आहे. प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक ७ ऑक्टोबरनंतर जाहीर करण्यात येणार आहे.

माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. राज्यात यंदा पहिल्यांदाच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ९ हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ७१ हजार ५७८ जागांसाठी राबवलेल्या दहा फेऱ्यांतून एकूण १३ लाख ४२ हजार ४३८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यात केंद्रीभूत प्रवेशाद्वारे ११ लाख ७२ हजार ९९७, राखीव कोट्याद्वारे १ लाख ६९ हजार ४४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला, तर ८ लाख २९ हजार १४० जागा रिक्त आहेत.

विधानसभा सभापती, शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी देण्यासाठी प्रवेश फेरी राबवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना ४ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत नोंदणी, प्राधान्यक्रम नोंदवणे, प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे. या फेरीत अर्ज भरताना विकल्प भरणे आणि नोंदणीची सुविधा शेवटी देण्यात येणार आहे.

विकल्प भरल्यानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा रिक्त असलेल्या जागांनुसार अर्जात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. विकल्प नोंदवता न आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालय जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतरही गुणानुक्रमे महाविद्यालय न मिळाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना विकल्प नोंदवण्याची सुविधा देऊन बदललेल्या विकल्पानुसार गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक स्तरावर विकल्प न बदलल्यास प्रवेश घ्यायचा नाही, असे समजून प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.