पिंपरी : ‘अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत कोणाचेच दुमत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून मार्ग काढतील,’ असे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी गुरुवारी वाकड येथे सांगितले. ‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दहा दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल,’ असेही त्यांनी सांगितले.
भरणे यांनी गुरुवारी वाकड येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मागील सहा महिन्यांपासून राज्यात पाऊस पडत आहे. अतिमुसळधार पाऊस पडतो. काही ठिकाणी एकाच दिवशी वर्षाएवढा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, पशुधन वाहून गेले. घरामध्ये पाणी शिरले, घरांची पडझड झाली. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर केले. पंचनाम्याचे काम आता संपले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा दिवसांत जमा होईल.
‘शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार पाठीशी आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यासाठी आणखी ११ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. जे शेतकरी कर भरत आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांना नुकसानभरपाईतून वगळले जाणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभे करणे सरकारचे कर्तव्य आहे. ते सरकार पार पडत आहे.’
‘शेतकरी अडचणीत असल्याबाबत कोणाचे दुमत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सर्वांचे एकमत आहे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बच्चू कडू यांच्याशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. चर्चेतून तोडगा निघेल.’ असा विश्वासही भरणे यांनी व्यक्त केला.
