पुणे शहर, जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ घसरले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनायक करमरकर, पुणे</strong>

पुणे शहर आणि जिल्ष्टय़ात जास्तीत जास्त जागा मिळवून राष्ट्रवादीला धक्का देण्याचा महायुतीचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला आहे. मावळात राज्यमंत्री, भाजपचे बाळा भेगडे, पुरंदरमध्ये राज्यमंत्री, शिवसेनेचे विजय शिवतारे आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील इंदापुरात पराभूत झाले, तर बहुचर्चित कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक, बारामतीमधून अजित पवार आणि आंबेगावमधून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवला.

पुणे शहरातील आठपैकी सहा जागा भाजपला मिळाल्या असून पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी दोन जागा भाजपला आणि एक जागा राष्ट्रवादीला मिळाली. शहर, जिल्ह्य़ात महायुतीचे नुकसान झाले आहे. महायुती १६ जागांवरून नऊ जागांवर आली आहे, तर राष्ट्रवादीच्या जागा तीनवरून १० वर गेल्या आहेत.

पुण्यातील आठही जागाजिंकण्याचे आव्हान भाजपपुढे होते. मात्र वडगावशेरी, हडपसर या जागा भाजपने गमावल्या असून तेथे राष्ट्रवादीचे अनुक्रमे सुनील टिंगरे आणि चेतन तुपे विजयी झाले. टिंगरे यांनी भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांचा तर तुपे यांनी आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला. कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून आमदार माधुरी मिसाळ, खडकवासलामधून आमदार भीमराव तापकीर, कॅण्टोन्मेंटमधून सुनील कांबळे आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. चिंचवडमधून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीतून यंदा भाजपकडून निवडणूक लढवलेले अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी  विजय मिळवला. मात्र पिंपरीची जागा शिवसेनेने गमावली आहे.

ग्रामीण भागात राष्ट्रवादीला यश

गेल्या निवडणुकीत २१ पैकी तीनच जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. त्यात सात जागांची वाढ झाली.  जुन्नरमधून गेल्या निवडणुकीत मनसेकडून विजयी झालेले आमदार शरद सोनावणे या वेळी शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांचा राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांनी ९ हजार मतांनी पराभव केला. पिंपरीचे शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी पराभव केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra election result 2019 harshvardhan patil defeated along with two ministers zws