लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: इंडियन सायन्स काँग्रेसच्या धर्तीवर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकारातून महाराष्ट्र सायन्स काँग्रेस सुरू करण्याची कल्पना आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्र आणि विज्ञान, संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद सुरू असून, नोव्हेंबरमध्ये त्या बाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी या वेळी उपस्थित होते. डॉ. गोसावी यांनी भविष्यातील योजना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

आणखी वाचा-सावकाराच्या जाचाला कंटाळून पुण्यात एकाची आत्महत्या

विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या दृष्टीने विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची निर्मिती ३० सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. विद्यापीठात एक हजार विद्यार्थी आणि एक हजार विद्यार्थीनी यांच्यासाठी सुसज्ज वसतिगृह, पदवीस्तरावरील अभ्यासक्रम, केंद्रीय संशोधन अनुदान सहायता कक्ष, अनुदानातून विविध प्रकारच्या खरेदीसाठी केंद्रीय खरेदी आणि निविदा कक्षाची स्थापना, तसेच अपंग सहायता कक्ष आणि समान संधी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तसेच अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकघर सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गोसावी यांनी दिली.

शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व देण्यात आले असल्याने मराठी भाषेतून अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वतंत्र केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. या केंद्राद्वारे अभ्यासक्रमाची निवड, शैक्षणिक साहित्य, अध्यापन, भविष्य आदींवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थी रोजगारक्षम होण्यासाठी प्रत्येक सत्रात काही कौशल्य अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी उद्योगांशी सातत्याने संवाद सुरू आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या १११ पदांची भरती प्रक्रिया येत्या काही महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे डॉ. गोसावी म्हणाले.

आणखी वाचा- वंदे भारत एक्सप्रेस लवकरच येणार नवीन रूपात! असे असतील गाडीतील आधुनिक बदल…

संशोधनावर भर

विद्यापीठातील संशोधन वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी नियमित संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांना प्रोत्साहन संशोधनात मागे असलेल्या प्राध्यापकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले.

इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्ससाठी विद्यापीठ दावेदार

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स दर्जासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दावेदार आहे. या पूर्वी हा दर्जा मिळण्यासाठी झालेल्या सादरीकरणांमध्ये माझा सहभाग होता. त्यामुळे त्या दृष्टीने पत्रव्यवहार सुरू आहे. या दर्जासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांची भेट घेणार असल्याचेही डॉ. गोसावी यांनी सांगितले.

वन विभागातील अधिकाऱ्यांसाठी अभ्यासक्रम

वन विभागात भरती होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासोबत, त्यांना विभागांतर्गत पदोन्नतीच्या दृष्टीने प्रशिक्षण मिळावे, यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सरकारकडून प्रस्ताव आला होता. त्यानुसार हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येत असल्याचे डॉ. गोसावी यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra science congress will start in pune pune print news ccp 14 mrj