पुणे रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची काल रात्री सूरज आनंद शुक्ला या आरोपीने विटंबना केली. या घटनेची माहिती शहरात समजताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला.

या प्रकरणातील आरोपी सूरज आनंद शुक्ला याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांनी आरोपी सूरज आनंद शुक्ला याला विचारले की, पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का ? त्यावर आरोपी सूरज आनंद शुक्ला याने न्यायालयाचा अवमान केला. या प्रकरणी आरोपी सूरज आनंद शुक्ला याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांनी सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावत १ हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला.